Ticker

6/recent/ticker-posts

कडबगाव तांड्यात पाचवीचा वर्ग सुरू; विद्यार्थ्यांना मिळणार उच्च शिक्षणाची नवी संधी


नवीन बोअरवेलचे पूजन; CSR निधीतून मिळालेल्या इंटरॅक्टिव्ह पॅनेलसह शैक्षणिक साहित्याचे उद्घाटन

सोलापूर : कडबगाव तांडा (डिग्गेवाडी),जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा,कडबगाव तांडा (डिग्गेवाडी) येथे इयत्ता पाचवीचा नवीन वर्ग सुरू करण्यात आला. तसेच पंचायत समिती सदस्या,नागणसुर गणाच्या वैष्णवी वीरभद्र सलगरे यांच्या प्रयत्नातून शाळेला मिळालेल्या नवीन बोअरवेलचे पूजन आणि Ree New Solar Energy संचालक,येरळा प्रोजेक्ट्स,सांगली यांच्या CSR निधीतून मिळालेल्या Interactive Panel Board व अन्य शालेय उपयोगी साहित्याचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले.

दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमामुळे कडबगाव तांडा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधांमध्ये महत्त्वाची भर पडली आहे. इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज कमी होणार असून,गावातीलच शाळेत पुढील शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून पाचवीचा वर्ग मंजूर
जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पाचवीचा नवीन वर्ग मंजूर होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे आणि विस्ताराधिकारी लकप्पा पुजारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाच्या स्तरावर करण्यात आलेल्या प्रयत्नांचे यावेळी कौतुक करण्यात आले.



CSR निधीतून डिजिटल शिक्षणाला चालना - Ree New Solar Energy संचालक,येरळा प्रोजेक्ट्स,सांगली यांच्या CSR निधीतून शाळेला Interactive Panel Board तसेच इतर शालेय उपयोगी साहित्य उपलब्ध झाले आहे. या डिजिटल साधनामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

कार्यक्रमाला चार तांड्यांतील ग्रामस्थांची उपस्थिती - कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद गटाचे सदस्य सिद्धाराम शिवमुर्ती होते. यावेळी पंचायत समिती सदस्या वैष्णवी वीरभद्र सलगरे,जिल्हा परिषद माजी सदस्य महिबूब मुल्ला,कडबगावचे उपसरपंच हनमंत कापसे,जाफर मुल्ला, तसेच कडबगाव केंद्राचे केंद्रप्रमुख शांतमलय्या स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय टोपू तांडा,काशीनाईक तांडा,वसंतराव नाईक नगर तांडा आणि कडबगाव तांडा या चारही तांड्यांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.



शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य - कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक इरय्या सी.स्वामी, उपशिक्षिका अनुराधा शामसुंदर भुजबळ,माळीवस्ती गौडगाव बु. येथील शिक्षक बसवराज स्वामी,केंद्रप्रमुख शांतमलय्या स्वामी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश चव्हाण व समितीचे इतर सदस्य,धर्मा राठोड तसेच ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

कडबगाव तांड्यात पाचवीचा वर्ग सुरू होणे,शाळेला नवीन बोअरवेल मिळणे आणि डिजिटल शिक्षणासाठी Interactive Panel Board उपलब्ध होणे,या तीनही बाबींमुळे शाळेच्या शैक्षणिक विकासाला मोठी चालना मिळाली असून,विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.