तळोज्यात ईद मिलादुन्नबीचा संदेश; ‘अमन,शांती आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम ठेवूया’
उत्साह, भक्तिभाव आणि सामाजिक एकतेच्या संदेशाने ईद मिलादुन्नबीचा जुलूस उत्साहात संपन्न
तळोजा : प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त तळोजा फेज-१ परिसरात ईद मिलादुन्नबीचा उत्सव मोठ्या उत्साहात,भक्तिभावात आणि सामाजिक एकतेचा संदेश देत साजरा करण्यात आला. अमन,शांती,मानवता,बंधुभाव,सर्वधर्मसमभाव,नशामुक्ती, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मुस्लिम बांधवांनी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ईद मिलादुन्नबी साजरी केली.
तळोजा फेज-१ परिसरात पारंपरिक पद्धतीने नात, दुआ आणि नबी प्रेमाचा जयघोष करण्यात आला. जुलूसमध्ये सहभागी नागरिकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सत्कार-सन्मान, फुलांची भेट व पुष्पवाटप, सरबत तसेच गोड मिष्ठान्नाचे वाटप करण्यात आले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोठ्या संख्येने नागरिक जुलूसमध्ये सहभागी झाले होते. इस्लामिक संस्कृतीचे पारंपरिक पोशाख परिधान करून सहभागी झालेल्या नागरिकांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
परिसरातील इमारती,प्रवेशद्वारे, कमानी,मशिदी आणि मदरसे आकर्षक विद्युत रोषणाई व सजावटीने सजविण्यात आले होते. धर्मगुरू आणि उलेमांनी आपल्या मार्गदर्शनातून प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी दिलेला बंधुभाव,मानवता,दया, शांतता आणि एकात्मतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.
या कार्यक्रमाला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) रायगड जिल्हाध्यक्ष प्रसाद सुभाष ढगेपाटील,नगरसेविका प्रमिला पाटील,हरेश केणी,नवनाथ पाटील आणि रामदास पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी ईद मिलादुन्नबीच्या शुभेच्छा देत तळोजा परिसरातील सामाजिक सलोखा,बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाची भावना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.
हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन
सत्कार स्वीकारताना प्रसाद सुभाष ढगेपाटील यांनी सर्वधर्मीय सण-उत्सव हे समाजातील बंधुभाव आणि एकोपा वाढविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. तळोजा परिसरात अनेक वर्षांपासून असलेली हिंदू-मुस्लिम ऐक्याची आणि सामाजिक सलोख्याची परंपरा यापुढेही कायम राहावी,अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रत्येकाच्या श्रद्धा,भावना आणि सांस्कृतिक परंपरांचा आदर करून समाजातील सर्व घटकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. शांतता,बंधुभाव आणि मानवतेचा संदेश पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे,असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
पोलीस प्रशासनाचे विशेष कौतुक - ईद मिलादुन्नबीचा जुलूस शांततेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त,पोलीस उपायुक्त,वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनबद्ध बंदोबस्ताबद्दल आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस प्रशासनासोबतच अनेक मुस्लिम स्वयंसेवकांनीही विशेष मेहनत घेतली. स्वयंसेवकांनी जुलूसदरम्यान शिस्त,वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या सोयीसाठी सहकार्य केले.
मानवता आणि शांततेचा संदेश - प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी दिलेला मानवता, बंधुभाव, शांतता आणि सद्भावनेचा संदेश आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. याच विचारांचा जागर करत तळोज्यातील ईद मिलादुन्नबीचा सोहळा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकता आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा ठरला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोहम्मद अली निजामी,सिराज अहमद,नासिर शेख,सलाउद्दीन शेख तसेच गरीब नवाज ट्रस्ट आणि कादरी एज्युकेशन ट्रस्ट यांनी विशेष पुढाकार घेतला. आयोजकांनी उपस्थित सर्व मान्यवर, धर्मगुरू,उलेमा,सामाजिक व धार्मिक संस्थांचे पदाधिकारी, पोलीस प्रशासन,स्वयंसेवक आणि सहभागी नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.
“सण-उत्सव वेगवेगळे असले तरी माणुसकीचा धर्म एकच; तळोज्याची हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा अशीच कायम राहो,” या सकारात्मक संदेशाने ईद मिलादुन्नबीचा जुलूस उत्साहात आणि शांततेत संपन्न झाला.
