Ticker

6/recent/ticker-posts

बार्शीत ‘पाणीबाणी’ घोषित करा! त्रयस्थ नागरिकाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी



१० ते १४ दिवसांनी पाणीपुरवठा; मुसळधार पावसातही नळ कोरडे,प्रशासनाच्या नियोजनावर सवाल

सोलापूर : बार्शी शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाने नागरिकांच्या अडचणी वाढल्या असून, तब्बल १० ते १४ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शहर परिसरात मुसळधार पाऊस पडत असतानाही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने बार्शी शहरात तातडीने ‘पाणीबाणी’ घोषित करावी,अशी मागणी त्रयस्थ नागरिक मनिष रविंद्र देशपांडे यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील पाणीपुरवठ्याचे निश्चित वेळापत्रक नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. कधी दिवसा तर कधी रात्री-अपरात्री पाणी सोडले जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी जागरण करण्याची वेळ येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मुसळधार पाऊस होत असतानाही १० ते १४ दिवसांनी पाणी मिळत असेल,तर हा प्रश्न पाण्याच्या उपलब्धतेचा आहे की प्रशासनाच्या नियोजनाचा? असा थेट सवालही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.





जलव्यवस्थेचा तातडीने आढावा घेण्याची मागणी
बार्शी शहरातील जलस्रोत,उपलब्ध पाणीसाठा,पाणीउपसा आणि वितरण व्यवस्था यांचा तातडीने आढावा घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना निश्चित वेळापत्रकानुसार नियमित पाणीपुरवठा करावा, आवश्यक भागात टँकरची व्यवस्था करावी,पाणीगळती तातडीने दुरुस्त करावी आणि पाणीपुरवठ्यातील त्रुटींसाठी संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

‘पाणी नाही तर पाणीपट्टी कशासाठी?’
ज्या भागात नियमित पाणीपुरवठा होत नाही,त्या भागातील नागरिकांकडून पाणीपट्टीही त्याच प्रमाणात आकारण्यात यावी, अशी मागणीही देशपांडे यांनी केली आहे.

दरम्यान,प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून बार्शीतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवावा. अन्यथा नागरिकांच्या प्रश्नासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.