Ticker

6/recent/ticker-posts

कारागृहातील बंदी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा

सामाजिक सेवाभावी संस्थांचा कौतुकास्पद उपक्रम

सोलापूर : सोलापूर जिल्हा कारागृह,वर्ग-2 येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय,शाखा सोलापूर,महिला उत्थान मंडळ तसेच अन्नपूर्णा फाऊंडेशन संचलित जय हिंद फूड बँक,सोलापूर या सामाजिक सेवाभावी संस्थांच्या वतीने कारागृहातील बंदी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन उत्सव उत्साहपूर्ण व भावूक वातावरणात साजरा करण्यात आला.

बंदी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच त्यांच्यातील मानवी संवेदना जागृत ठेवण्याच्या उद्देशाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक संस्थेतील मनाली तमशेट्टी व जयमाला राजपूत यांनी रक्षाबंधन सणाचे महत्त्व सांगितले. तसेच विजयालक्ष्मी चव्हाण,मीनाक्षी चव्हाण,प्रतिभा तमशेट्टी,ब्रह्मकुमारी सदिक्षा यांच्यासह अन्य महिलांनी बंदी बांधवांना राख्या बांधल्या.


राखी बांधताना अनेक बंदी बांधवांना आपल्या कुटुंबीयांची व बहिणींची आठवण झाली. त्यामुळे काही बंदी बांधव भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

“या उपक्रमाच्या माध्यमातून बंदी बांधवांमध्ये सकारात्मक बदल व्हावा,” हा मुख्य उद्देश असल्याचे कारागृह अधीक्षक सुशील कुंभार यांनी सांगितले. तसेच या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सामाजिक सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींचे त्यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी कारागृह अधीक्षक सुशील कुंभार,वरिष्ठ तुरूंगाधिकारी बिरू खळबुटे  तसेच कारागृह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
            
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारागृह शिक्षक अंगद गव्हाणे यांनी केले. अशी माहिती  जिल्हा कारागृह अधिक्षक सुशील कंभार यांनी दिली आहे.