शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजाच्या सांस्कृतिक व वैचारिक चळवळीला दिशा; वर्धापन दिनानिमित्त ‘एमडी२४ न्यूज’ परिवाराच्या शिवमय शुभेच्छा
सोलापूर : मराठा सेवा संघाच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त संघटनेच्या कार्यकर्त्यांसह समाजबांधवांकडून हार्दिक शिवशुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. १ सप्टेंबर १९९० रोजी अकोला जिल्ह्यात शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पुढाकारातून मराठा सेवा संघाची स्थापना झाली. गेल्या ३६ वर्षांत संघटनेने सामाजिक,सांस्कृतिक आणि वैचारिक प्रबोधनाच्या माध्यमातून समाजात आपला स्वतंत्र ठसा निर्माण केला आहे.
प्रारंभी कर्मचारी-अधिकाऱ्यांचे संघटन म्हणून ओळख निर्माण झालेल्या मराठा सेवा संघाने पुढील काळात बहुजन तरुणाईच्या हातात पुस्तक देण्याचे आणि वैचारिक प्रबोधन करण्याचे काम व्यापक स्वरूपात केले. त्यामुळे संघटना बहुजनांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र बनल्याचे समर्थकांचे मत आहे.
मराठा सेवा संघाच्या माध्यमातून शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार,इतिहासाचे वाचन,सामाजिक प्रश्नांवर चर्चा आणि वैचारिक जागृती यावर भर देण्यात आला. महाराष्ट्रातील तरुणाईमध्ये वाचन,अभ्यास आणि सामाजिक प्रश्नांकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्याची प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी संघटनेने सातत्याने प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी अभ्यास आणि संशोधनाच्या माध्यमातून ‘शिवधर्म’ या संकल्पनेचा पुरस्कार केला. त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या कार्यकर्त्यांनी राज्याच्या विविध भागांत संघटनेचे कार्य पुढे नेले.
दरम्यान,मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये निर्माण झालेली व्यापक जनजागृती आणि मोठ्या संख्येने सहभागी होणारे आंदोलक यांचाही उल्लेख वर्धापन दिनाच्या निमित्ताने करण्यात येत आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. या आंदोलनातील शांततामय आणि संघटित सहभागामागे समाजात गेल्या अनेक वर्षांत झालेल्या वैचारिक प्रबोधनाचाही वाटा असल्याचा दावा संघटनेचे समर्थक करतात.
“आरक्षणाच्या आंदोलनात आंदोलनकर्त्यांचा नव्हे,तर शासनाचा परीक्षा काळ आहे,” असा विचारही यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे.
मराठा सेवा संघाने गेल्या ३६ वर्षांत सामाजिक प्रश्न, इतिहास,संस्कृती आणि बहुजन प्रबोधनाच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेताना,संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या विविध भागांत विचारांची चळवळ पोहोचविण्याचे काम केले असल्याचे सांगण्यात येते.
मराठा सेवा संघाच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर तसेच राज्यभरातील सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी आणि समाजबांधवांना ‘एमडी२४ न्यूज परिवार’च्या वतीने हार्दिक शिवमय शुभेच्छा!
शुभेच्छुक : एमडी२४ न्यूज परिवार
