मुंबई : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नॅशनल अर्बन को-ऑप. फायनान्स अॅण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NUCFDC) च्या नवीन कार्यालय परिसराचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तसेच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी NUCFDCची भूमिका महत्त्वाची मानली जाते. नवीन कार्यालयाच्या माध्यमातून नागरी सहकारी वित्त क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी तसेच सहकारी संस्थांना आवश्यक आर्थिक व विकासात्मक पाठबळ देण्याच्या दृष्टीने कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
दरम्यान,मुंबई दौरा आटोपल्यानंतर केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह रवाना झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री जयकुमार रावल, मंत्री मंगलप्रभात लोढा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार अमित साटम, महापौर रितू तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, NUCFDC च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन हे नागरी सहकारी वित्त क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
