Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विणकर बांधवांचा सन्मानपत्र देऊन गौरव

हातमाग प्रदर्शन व कायमस्वरूपी संग्रहालय उभारणीच्या मागणीचा सकारात्मक विचार करणार : महापौर विनायक कोंड्याल

सोलापूर : सोलापूरच्या ऐतिहासिक हातमाग परंपरेचा गौरव करत राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विणकर बाग येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी हातमागावर काम करणाऱ्या विणकराच्या प्रतीकात्मक पुतळ्यास महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच हातमाग उद्योगात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विणकर बांधवांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर,महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम,पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉ.सूर्यप्रकाश कोठे,नगरसेवक प्रथमेश कोठे, सोलापूर मार्कंडेय सहकारी रुग्णालयाचे प्रेसिडेंट 
सत्यनारायण बोल्ली,अशोक इंदापुरे,ज्येष्ठ माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू,नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल,सत्यनारायण गुर्रम, विनोद भोसले,अक्षय अंजीखाने,श्रीनिवास कोंडी,विजय चिप्पा,प्रशांत पल्ली,माजी नगरसेविका कुमुद अंकाराम, अंबादास बिगी,मंडळ अध्यक्ष नागेश सरगम,नागेश खरात, अजय दासरी,श्रीनिवास क्यातम,वासुदेव इपलपल्ली, मुरलीधर आरकाल,रमेश विडप,मल्लिकार्जुन आरकाल यांच्यासह विणकर समाजाचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी,महिला,युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



हातमाग क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष सत्कार - हातमाग उद्योगाच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणारे प्रवीण फलमारी,नागनाथ वंगा,विजय बडगु,व्यंकटेश येमूल,महेश संचू,सत्यनारायण गंगा,श्रीनिवास अनंतुल तसेच श्री.झुंजा यांचा महापौर विनायक कोंड्याल व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

दरम्यान,सोलापूर शहर भाजपच्या वतीने राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विणकर बांधवांना विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या सन्मानपत्रातून सोलापूरच्या जागतिक कीर्तीच्या हातमाग उद्योगाचा गौरव करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमातून सोलापूरच्या विणकरांचा आणि वस्त्रोद्योगाचा उल्लेख करून केलेल्या गौरवाचीही यावेळी आठवण करून देण्यात आली.
'व्होकल फॉर लोकल' या संकल्पनेला बळ देत सोलापूरच्या हातमाग उद्योगाच्या प्रगतीसाठी विणकर समाजाने दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानपत्राद्वारे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या उपक्रमाचे मार्गदर्शक आमदार देवेंद्र कोठे असून,संयोजक नगरसेवक सीए. विनोद धर्मा भोसले व नागेश सुरेश खरात यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. दरवर्षी सात दिवसांचे हातमाग प्रदर्शन भरविण्याची मागणी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक इंदापुरे यांनी केले. सोलापूरच्या हातमाग उद्योगाचा समृद्ध इतिहास आणि विणकर समाजाची परंपरा जतन करण्यासाठी विणकर बाग येथे दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सात दिवसांचे हातमाग प्रदर्शन आयोजित करण्यात यावे,अशी मागणी त्यांनी केली.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून सोलापुरी चादर,टॉवेल तसेच इतर हातमाग उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल. त्याचबरोबर हातमाग उद्योगाचा इतिहास, पारंपरिक विणकामाची साधने, विविध प्रकारची वस्त्रे आणि विणकर समाजाचा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कायमस्वरूपी हातमाग संग्रहालय (म्युझियम) उभारण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.


महानगरपालिका सकारात्मक विचार करणार : महापौर
यावेळी बोलताना महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, "सोलापूरची ओळख हातमाग उद्योग आणि विणकरांच्या कष्टाळू परंपरेमुळे देशभर निर्माण झाली आहे. हजारो विणकरांच्या अथक परिश्रमातून सोलापुरी चादर, टॉवेल आणि इतर हातमाग वस्त्रांनी देश-विदेशात वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा अमूल्य वारसा जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे."

 ते पुढे म्हणाले, "विणकर समाजाने मांडलेली सात दिवसांच्या हातमाग प्रदर्शनाची तसेच कायमस्वरूपी हातमाग संग्रहालय उभारण्याची मागणी अत्यंत रास्त आहे. या मागण्यांचा महानगरपालिका प्रशासनामार्फत सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हातमाग उद्योगाला चालना देणे, विणकरांच्या कलेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सोलापूरचा सांस्कृतिक व औद्योगिक वारसा जतन करणे यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे."

‘लोकल ते ग्लोबल’चा संकल्प करण्याचे आवाहन
राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने महापौरांनी सर्व विणकर बांधवांना शुभेच्छा दिल्या. पारंपरिक हातमाग उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, नव्या बाजारपेठांची उपलब्धता आणि युवकांचा सक्रिय सहभाग मिळवून देण्यासाठी शासन, महानगरपालिका आणि समाजाने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ‘लोकल ते ग्लोबल’ या संकल्पनेनुसार सोलापूरच्या हातमाग उत्पादनांचा देश-विदेशात अधिक व्यापक प्रचार व प्रसार करून सोलापुरी वस्त्रांना मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचा समारोप सोलापूरच्या विणकर समाजाच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान व्यक्त करत आणि हातमाग उद्योगाच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करून करण्यात आला.