Ticker

6/recent/ticker-posts

श्री सिद्धेश्वर कारखान्याकडे थकली ऊस बिले; २१ ऑगस्टपर्यंत रक्कम न दिल्यास २४ ऑगस्टपासून तीव्र आंदोलनाचा इशारा


शेतकरी संघर्ष समिती आक्रमक; थकीत ऊस बिलांवरून कारखाना प्रशासनाला धारेवर धरले

सोलापूर : कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची ऊस बिले मोठ्या प्रमाणात थकीत असल्याने शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. थकीत ऊस बिलांची रक्कम तातडीने अदा करावी, अन्यथा २४ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा स्पष्ट इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.

श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची मोठी रक्कम थकीत आहे. ही थकीत रक्कम २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अदा न केल्यास २४ ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष समितीने घेतला आहे. यासंदर्भात समितीने सोलापूर तसेच धाराशिव येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान,शेतकऱ्यांची थकीत बिले तातडीने देण्याच्या सूचना कारखाना प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील तरतुदीनुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर दराची (FRP) रक्कम मुदतीत देणे बंधनकारक आहे. मात्र,मुदत संपूनही कारखान्याकडून ऊस बिलांची रक्कम अदा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिले न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा - शेतकऱ्यांची ऊस बिलाची थकीत रक्कम अदा न केल्यास कारखाना प्रशासनाविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक सहसंचालक (साखर) किरण गायकवाड यांनी दिल्याचे समितीने सांगितले आहे. त्यामुळे आता कारखाना प्रशासनाकडून थकीत बिले किती लवकर अदा केली जातात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आठ महिने उलटूनही बिले मिळाली नसल्याचा आरोप
“श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याला ऊस घालून आठ महिने उलटून गेले आहेत. अद्यापही धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांची बिले मिळालेली नाहीत. 

२१ ऑगस्टपर्यंत बिले जमा न झाल्यास २४ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
थकीत ऊस बिलांची रक्कम तातडीने अदा करावी.
थकीत रकमेवर नियमानुसार व्याज द्यावे.
ऊस दराबाबत शेतकऱ्यांना पारदर्शक माहिती द्यावी.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन व कारखाना व्यवस्थापनाची विशेष बैठक घ्यावी.

FRPची रक्कम नियमानुसार मुदतीत अदा करावी - २१ ऑगस्टपर्यंत थकीत ऊस बिलांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही, तर २४ ऑगस्टपासून आंदोलन छेडण्याचा निर्धार शेतकरी संघर्ष समितीने व्यक्त केला आहे. त्यामुळे सिद्धेश्वर कारखाना प्रशासन आता कोणती भूमिका घेते,याकडे शेतकरी आणि सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.