Ticker

6/recent/ticker-posts

५०० मतदारांची नोंदणी करणाऱ्यांना सर्वाधिक निधी देण्याची जयकुमार गोरे यांची घोषणा


सोलापुरात भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीत 

‘मिशन पदवीधर’चा निर्धार; SIR पडताळणीसह संघटनात्मक बांधणीवर मंथन

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; ५०० मतदारांची नोंदणी करणाऱ्यांना सर्वाधिक निधी देण्याची जयकुमार गोरे यांची घोषणा

सोलापूर : भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठकीचे आयोजन गुरुवारी सोलापुरातील बालाजी सरोवर हॉटेल येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. सोलापूर,पुणे,सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

बैठकीत आगामी राजकीय व संघटनात्मक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. विशेषतः SIR (Special Intensive Revision) अंतर्गत मतदार यादी पडताळणी, संघटनात्मक बांधणी तसेच आगामी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अभियान यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

SIR पडताळणीकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी SIR प्रक्रियेवर विशेष भर दिला. मतदार यादीच्या पडताळणीच्या कामाकडे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मतदार यादीची अचूकता आणि संघटनात्मक पातळीवरील प्रभावी नियोजन महत्त्वाचे असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.

मिशन पदवीधर’ला वेग - बैठकीत पुणे पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या तयारीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाचा राजकीय इतिहास, मागील निवडणुकीतील अनुभव आणि आगामी निवडणुकीसाठी मतदार नोंदणीची रणनीती याबाबत मार्गदर्शन केले.

पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार नोंदणीचा आढावा घेतला. उपलब्ध माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील नोंदणीमध्ये कोल्हापूर आघाडीवर असून सांगलीत सुमारे ७७ हजार, तर सोलापूर जिल्ह्यात सुमारे ३३ हजार नोंदणी झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

यावेळी पंचायत समिती सदस्यांनी किमान ५० मतदारांची, तर जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवकांनी १०० मतदारांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. विशेष म्हणजे ५०० मतदारांची नोंदणी करणाऱ्या सदस्यांना सर्वाधिक निधी देण्यात येईल, अशी घोषणा जयकुमार गोरे यांनी केली.

बैठकीला प्रमुख नेत्यांची उपस्थिती - या बैठकीस भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,मंत्री चंद्रकांत पाटील,ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे,भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे,प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे,SIR महाराष्ट्र प्रभारी भगवानदास सबनानी,SIR प्रदेश संयोजक डॉ.किरीट सोमय्या यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख हेही बैठकीला पूर्णवेळ उपस्थित होते. दुसरीकडे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे हे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. भाजप पदाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार कल्याणशेट्टी प्रकृती अस्वास्थ्यामुळे, तर देवेंद्र कोठे पूर्वनियोजित परदेश दौऱ्यामुळे अनुपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्रातील संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार - सोलापूरसह पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेत आगामी काळात बूथ पातळीपर्यंत पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे,मतदारांशी थेट संपर्क वाढविणे आणि पदवीधर-शिक्षक मतदारांची प्रभावी नोंदणी करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

एकूणच, SIR पडताळणी आणि पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी या दोन प्रमुख मुद्द्यांभोवती सोलापुरातील भाजपची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक केंद्रित राहिली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीच्या माध्यमातून भाजपने पश्चिम महाराष्ट्रात संघटनात्मक तयारीला वेग देत ‘मिशन पदवीधर’ ची दिशा स्पष्ट केली आहे