Ticker

6/recent/ticker-posts

मुळेगाव येथे ‘ग्रामसभा आणि आम्ही भारताचे लोक’ विषयावर विशेष कार्यशाळा संपन्न


“महिलांची ग्रामसभेतील उपस्थिती आणि नागरी समित्यांमधील सक्रियता हीच खऱ्या लोकशाहीची ताकद” - युवराज गटकळ

सोलापूर : रुद्रा संस्था आणि कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथे ‘ग्रामसभा आणि आम्ही भारताचे लोक’ या विषयावर एकदिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. लोकशाही बळकटीकरण,संविधानाची मूल्ये, ग्रामसभा तसेच ग्रामपंचायतीच्या कारभारात महिलांचा सक्रिय सहभाग याबाबत या कार्यशाळेत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेस रुद्रा संस्थेचे सचिव युवराज गटकळ,कोरो इंडियाच्या विभागीय प्रतिनिधी दिपाली राठोड,रुद्रा संस्थेच्या लीडर महादेवी बिराजदार,संध्या दुपारगडे यांच्यासह मुळेगाव, श्रूपणहाळी,दर्गनहळी आणि कर्देहळी येथील सोबती गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


महिलांनी निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा - कार्यशाळेत मार्गदर्शन करताना युवराज गटकळ म्हणाले, “ग्रामसभेत महिलांची केवळ उपस्थिती पुरेशी नाही. 

महिलांनी आपल्या समस्या ठामपणे मांडल्या पाहिजेत आणि ग्रामपंचायतीच्या विविध नागरी समित्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. संविधानाने दिलेले अधिकार,कर्तव्ये आणि मूल्ये समजून घेऊन महिलांनी निर्णय प्रक्रियेत सहभाग घेतल्यासच खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट होईल.”


चार्ट व प्रात्यक्षिकांद्वारे विविध विषयांवर चर्चा - कार्यशाळेदरम्यान महिलांचे विविध गट तयार करून त्यांना वेगवेगळ्या विषयांवर चार्ट तयार करण्याचे तसेच त्यांचे सादरीकरण करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायतीची रचना व कामकाज,सरपंच-उपसरपंच व ग्रामसेवकांची कार्ये,ग्रामसभा व महिला ग्रामसभेचे महत्त्व, ग्रामसभेत ठराव मांडण्याची पद्धत, आरोग्य व पोषण समिती, पाणी व स्वच्छता समिती,शाळा व्यवस्थापन समिती आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

तसेच स्वातंत्र्य,समता,बंधुता,संविधानिक हक्क व नागरिकांची कर्तव्ये याबाबतही महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिक पातळीवरील प्रश्न सामूहिकपणे मांडण्यासाठी सोबती गट व ग्राम गटांचे संघटन मजबूत करण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.



लिंगभाव समानतेवरही मार्गदर्शन - दिपाली राठोड यांनी लिंगभाव समानता आणि स्वतःमधील सकारात्मक बदल या विषयावर संवाद साधला. पुढील पिढीतील मुलांच्या जडणघडणीमध्ये कुटुंबातील व समाजातील वर्तनाचा मोठा प्रभाव असतो. मोठी माणसे ज्या पद्धतीने वागतात,त्याचे अनुकरण लहान मुले करत असतात. त्यामुळे समानता,आदर आणि संविधानिक मूल्ये केवळ सांगण्यापेक्षा ती स्वतःच्या आचरणातून रुजविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.





महादेवी बिराजदार यांनी दिले पुढील कृती कार्यक्रमाचे मार्गदर्शन - महादेवी बिराजदार यांनी मागील दोन वर्षांतील प्रशिक्षण व उपक्रमांचा अनुभव उपस्थित महिलांसमोर मांडला. पुढील काळातील नियोजन आणि कृती कार्यक्रमाबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. ग्रामसभेचे महत्त्व, महिलांनी आत्मविश्वासाने मांडायची भूमिका तसेच ग्रामपंचायत आणि ग्रामसभेचे कामकाज याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

पाणी,पोषण,रस्ते आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर महिलांचे मंथन चार गावांतील सोबती गटाच्या महिलांनी कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. गावातील पिण्याचे पाणी,पोषण, रस्ते,स्वच्छता आणि इतर नागरी समस्या ग्रामसभेत प्रभावीपणे कशा मांडायच्या आणि त्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा कसा करायचा,याचे मार्गदर्शन महिलांना देण्यात आले.


‘महिलांओंके सहभाग बिना हर बदलाव अधुरा है’ या संदेशाने कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.

या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महादेवी बिराजदार,संध्या दुपारगडे,दिपाली राठोड आणि रुद्रा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यशाळेमुळे महिलांमध्ये ग्रामसभा,संविधान आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सहभागाबाबत आत्मविश्वास वाढल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली. कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल महिलांनी रुद्रा संस्था आणि कोरो इंडिया यांचे आभार मानले.