Ticker

6/recent/ticker-posts

उपेक्षित हातांत मानाचा तिरंगा; ‘व्वा’ संघटनेने जागवला वंचितांच्या मनात स्वातंत्र्याचा खरा भाव


सोलापूर : भिक्षुकांसोबत अनोख्या पद्धतीने साजरा केला ८० वा स्वातंत्र्यदिन ऊन,वारा आणि पाऊस अंगावर झेलत मंदिरांच्या पायऱ्यांवर तसेच रस्त्यांच्या कडेला उपेक्षित आयुष्य जगणाऱ्या भिक्षुकांच्या हातात जेव्हा अभिमानाने तिरंगा विसावला,तेव्हा स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला खऱ्या अर्थाने सामाजिक संवेदनशीलतेची जोड मिळाली.

‘व्वा’ संघटनेच्या महिलांनी ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सिद्धेश्वर मंदिर,काळजापूर मारुती,शनि मंदिर तसेच शाह हुजूरपाक दर्गा परिसरातील निराधार व भिक्षुक बांधवांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा केला.


एरवी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहणाऱ्या या नागरिकांना केवळ मिठाई वाटून कार्यक्रमाची औपचारिकता पूर्ण न करता, त्यांच्या हातात राष्ट्रध्वज देऊन त्यांना सन्मान आणि आपुलकीची जाणीव करून देण्यात आली. या अनपेक्षित स्नेहामुळे अनेक भिक्षुकांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू तरळले.


‘स्वातंत्र्य सर्वांसाठी’चा संदेश - समाजातील शेवटच्या घटकालाही ‘आपण या देशाचे सन्माननीय नागरिक आहोत’ याची जाणीव होणे,हाच स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे. ‘व्वा’ संघटनेच्या या संवेदनशील उपक्रमातून हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.





उपेक्षित जीवन जगणाऱ्या नागरिकांना मिळालेल्या या आपुलकीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. तिरंगा हातात देऊन त्यांचा आत्मसन्मान जागवण्याचा हा उपक्रम स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला सामाजिक बांधिलकीची नवी दिशा देणारा ठरला.


या हृदयस्पर्शी उपक्रमात संस्थेच्या विद्या लोलगे,सायरा शेख, लता ढेरे,मारता असादे,गौरा कोरे,वैशाली देशपांडे,पुष्पा हलकुडे,लक्ष्मी माने,शोभा गायकवाड यांच्यासह मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे माजी जिल्हा व्यवस्थापक सी.ए.बिराजदार उपस्थित होते.





वंचितांच्या हातात तिरंगा देत त्यांना सन्मानाची जाणीव करून देणारा हा उपक्रम म्हणजे स्वातंत्र्याचा केवळ उत्सव नव्हे,तर ‘सर्वांसाठी स्वातंत्र्य आणि सर्वांसाठी सन्मान’ या भावनेचा जिवंत संदेश ठरला.