सामाजिक,शैक्षणिक,पर्यावरण व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल
सोलापूर : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने युवकांसाठी तसेच जिल्ह्यातील युवकांच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यासाठी क्रीडा व युवक संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सोलापूर यांच्या वतीने जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यामध्ये जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, कोंडी या संस्थेला संस्था प्रवर्गातील जिल्हा युवा पुरस्कार सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष गणेश निळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन,सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन,सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य,शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे,अपर जिल्हाधिकारी गणेश निहाळी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाने गेल्या काही काळात सामाजिक,शैक्षणिक,पर्यावरण,आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबविले आहेत. संस्थेच्या वतीने आरोग्य शिबिरांचे आयोजन करून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व सेवा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी नामवंत व्याख्यात्यांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण व्हावी आणि त्यांना योग्य संधी मिळावी यासाठी संस्थेने विविध क्रीडा उपक्रमांना चालना दिली. तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले.
ग्रामीण भागातील युवकांसाठी संस्थेने केलेल्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने संस्थेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यावेळी संस्थेच्या प्राचार्य सुषमा निळ,दामोधर निळ,क्रीडा अधिकारी नदीम शेख,राहुल गायकवाड यांच्यासह संस्थेतील अधिकारी,कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
