“सत्य मांडणाऱ्या पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सहन करणार नाही”; मंदार गोंजारी यांच्या पाठीशी पत्रकार कृती समिती ठामपणे उभी
पुणे : सीईओपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी परिसरातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर वार्तांकन करत सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावर सीईओपी प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या कारवाईचा पत्रकार कृती समितीच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे.
मंदार गोंजारी हे महाराष्ट्रातील निर्भीड आणि अभ्यासू पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक संवेदनशील विषयांवर सातत्याने वार्तांकन करून प्रशासन आणि व्यवस्थेसमोरील प्रश्न जनतेसमोर मांडले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या पत्रकारितेची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली असून,रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
रामनाथ गोएंका पुरस्काराच्या अधिकृत नोंदीतही मंदार गोंजारी यांचे नाव ABP माझाच्या Broadcast विभागातील पुरस्कार विजेते म्हणून नोंदवलेले आहे.
विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडणे हा पत्रकाराचा गुन्हा कसा?
सीईओपी परिसरात विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेत त्यांच्या समस्या आणि म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न मंदार गोंजारी यांनी केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि संबंधित प्रशासनाची बाजू जनतेसमोर मांडणे ही पत्रकारितेची मूलभूत जबाबदारी आहे.
याच वार्तांकनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारावर गुन्हा दाखल होणे ही बाब पत्रकारिता क्षेत्रासाठी गंभीर आणि चिंताजनक असल्याची भूमिका पत्रकार कृती समितीने घेतली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया देत मंदार गोंजारी यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे. सीओईपीमधील कथित गैरप्रकाराच्या वार्तांकनानंतर हा गुन्हा दाखल झाल्याचा उल्लेख त्यांच्या प्रतिक्रियेत करण्यात आला आहे.
“पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही”
पत्रकार कृती समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की,पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजातील अन्याय,गैरप्रकार आणि नागरिकांच्या समस्या प्रशासनासमोर आणण्याचे काम पत्रकार करत असतात. त्यामुळे पत्रकाराने प्रश्न विचारला किंवा विद्यार्थ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करणे ही बाब लोकशाही मूल्यांच्या दृष्टीने तपासली जाणे आवश्यक आहे.
“मंदार गोंजारी हे माणदेशाचे सुपुत्र असून त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवणे आणि सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडणे हे त्यांचे काम आहे. त्यांच्या पत्रकारितेला रामनाथ गोएंका पुरस्कारासारखा राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो,” अशी भूमिका पत्रकार कृती समितीने व्यक्त केली आहे.
समितीने पुढे म्हटले आहे की,पत्रकारांवर दबाव निर्माण करून त्यांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न झाले,तर पत्रकार संघटना आणि पत्रकार कृती समिती गप्प बसणार नाही. मंदार गोंजारी यांच्या पाठीशी पत्रकार कृती समिती ठामपणे उभी असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पत्रकारावरील कारवाईचा फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर - या संपूर्ण प्रकरणामुळे पत्रकारिता स्वातंत्र्य,पत्रकारांना वार्तांकनादरम्यान मिळणारे अधिकार आणि शैक्षणिक संस्थांमध्ये माध्यमांना दिली जाणारी वागणूक याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
सत्य मांडणाऱ्या पत्रकाराचा आवाज दाबला जाऊ नये, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना माध्यमांनी व्यासपीठ मिळाले पाहिजे आणि पत्रकारांवरील गुन्हे दाखल करण्यापूर्वी परिस्थितीचा निष्पक्ष विचार झाला पाहिजे,अशी अपेक्षा पत्रकारिता क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
मंदार गोंजारी यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. पत्रकारितेची मुस्कटदाबी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही,असा इशारा पत्रकार कृती समितीने दिला आहे.
