Ticker

6/recent/ticker-posts

रॉबिन हूड आर्मी अक्कलकोटचा ९ वा वर्धापन दिन समाजसेवेने साजरा


गरजू बालकांना बिस्किट वाटप; नऊ वर्षांत साडेतीन ते चार लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत अन्नसेवा

अक्कलकोट  : "भूक ही धर्म, जात, पंथ पाहत नाही आणि माणुसकीलाही कोणत्याही सीमांचे बंधन नसते," या मानवतावादी विचाराला कृतीत उतरवत रॉबिन हूड आर्मी अक्कलकोटने आपल्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त गरजू बालकांना बिस्किटांचे वाटप करून समाजसेवेचा अनोखा संदेश दिला. अक्कलकोट शहरातील मंगरूळ पेट्रोल पंपामागील तसेच स्टेशन रोडवरील डी.एड. कॉलेजच्या पाठीमागील झोपडपट्टी परिसरातील गरीब, गरजू व निराधार मुलांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

मैत्री दिनाच्या पावन औचित्याने ५ ऑगस्ट २०१७ रोजी सोलापूर रॉबिन हूड आर्मी टीमचे हिंदुराव गोरे आणि अनिकेत चनशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली रॉबिन हूड आर्मी अक्कलकोटची स्थापना झाली. शहरातील हॉटेल, बेकरी, मंगल कार्यालये तसेच विविध घरगुती कार्यक्रमांमध्ये शिल्लक राहणारे सुस्थितीतील अन्न संकलित करून ते गरजू, भुकेल्या व बेघर नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य तेव्हापासून अखंडपणे सुरू आहे.



गेल्या नऊ वर्षांत संस्थेने साडेतीन ते चार लाखांहून अधिक गरजू नागरिकांना एक वेळचे अन्न उपलब्ध करून देण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. आजही शहरातील २५ ते ३० बेघर, गरीब आणि गरजू नागरिकांना नियमितपणे जेवण व फळांचे वाटप केले जाते.

याशिवाय, एस.टी. स्टँडमागील झोपडपट्टीतील एका अत्यंत गरजू कुटुंबातील तीन मतिमंद व दिव्यांग मुलांना गेल्या अनेक वर्षांपासून दररोज एक वेळचे जेवण न चुकता पुरविण्याचे सेवाकार्य संस्थेकडून सातत्याने सुरू आहे.
अन्नदानापुरतेच कार्य मर्यादित न ठेवता, बेवारस मनोरुग्ण, निराधार व भिक्षेकरी व्यक्तींना वैद्यकीय उपचार मिळवून देणे, त्यांचे पुनर्वसन करणे, हरवलेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुरक्षित पोहोचविणे तसेच उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास त्यांच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यासारखी मानवतावादी कार्येही रॉबिन हूड आर्मी अक्कलकोट सातत्याने करत आहे.

या समाजसेवेत रशीद खिस्तके, सोहेल फरास, समीर शेख, अशरफ गोलंदाज, सैपन शेख, ज्योतिबा पारखे यांच्यासह सर्व स्वयंसेवकांचे मोलाचे योगदान लाभले आहे. तसेच डॉ. विपुल शहा, डॉ. प्रमोद मजगे, डॉ. अशोक राठोड आणि डॉ. सतीश बिराजदार यांचे मार्गदर्शन, पोलीस प्रशासन, पत्रकार बंधू आणि असंख्य दानशूर नागरिकांचे सहकार्य संस्थेच्या कार्याला सातत्याने बळ देत आहे.



वर्धापन दिनानिमित्त आयोजित बिस्किट वाटप कार्यक्रमात रशीद खिस्तके,सोहेल फरास,अशरफ गोलंदाज,अली मुजावर,समर्थ गोरे,मुआज शेख,मुवाज शेख,रेहान शेख तसेच अन्य स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते व रॉबिन हूड आर्मी अक्कलकोटचे सदस्य सोहेल फरास म्हणाले, "माणुसकी हाच खरा धर्म आहे. मेल्यावर खांदा देण्यापेक्षा माणूस जिवंत असताना त्याला मदतीचा हात देणे अधिक महत्त्वाचे आहे."
"सेवा हीच खरी पूजा आणि माणुसकी हाच खरा धर्म" हे ब्रीदवाक्य अंगीकारून "कोणीही उपाशी झोपू नये" या संकल्पनेतून गरजूंना मदतीचा हात देण्याचे कार्य पुढील काळातही अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

सक्रिय सदस्य : टिपू गोलंदाज,बाबा शेख,समर्थ गोरे,मुवाज शेख,आशिष हुबे,आकाश शिंदे,देविदास गवंडी,सागर पवार, योगेश महेंद्रकर,मुस्तकीम खिस्तके,जुनेद गोलंदाज,ज्योतिबा पारखे,सैपन शेख,रशीद खिस्तके,सोहेल फरास आदी स्वयंसेवक सातत्याने समाजसेवेत योगदान देत आहेत.