Ticker

6/recent/ticker-posts

अक्कलकोटच्या विकासाला मोठी गती : श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरिडॉरसाठी पहिल्या टप्प्यात ₹५०० कोटींचा विकास आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश


मुंबई : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ₹५०० कोटींचा विकास आराखडा (Development Plan) तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी म्हाडा (MHADA) यांची विशेष नियोजन प्राधिकरण (Special Planning Authority) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (DPR), नियोजन, आवश्यक पायाभूत सुविधा आणि विविध शासकीय कामांचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला.


भाविकांना मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून अक्कलकोटमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांना आधुनिक आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामध्ये – मंदिर परिसराचे सुशोभीकरण,आधुनिक दर्शन व्यवस्था,प्रशस्त पार्किंग सुविधा,वाहतूक व्यवस्थेचे नियोजन,पायी चालणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षित मार्ग,स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधा,निवास व्यवस्था आणि इतर मूलभूत सोयीसुविधा
यांचा समावेश असणार आहे. या सुविधांमुळे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांचा दर्शनाचा अनुभव अधिक सुरक्षित,सुलभ आणि समाधानकारक होईल,असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.

अक्कलकोटला मिळणार जागतिक तीर्थक्षेत्राची ओळख
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोटचा विकास केवळ मंदिर परिसरापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र भूमीला जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
धार्मिक पर्यटनाला चालना मिळाल्याने स्थानिक रोजगार, व्यापारी व्यवहार, हॉटेल व्यवसाय, वाहतूक, लघुउद्योग आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



मुख्यमंत्र्यांचा सत्कार - या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व समस्त अक्कलकोटकरांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आले तसेच अक्कलकोटच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

बैठकीला मान्यवरांची उपस्थिती - या बैठकीस राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर,अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी,आमदार श्वेता महाले,मुख्य सचिव राजेश अग्रवाल,गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त सचिव असिमकुमार गुप्ता,म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल,मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी व लोकेश चंद्रा,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव नवीन सोना तसेच म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पामुळे अक्कलकोटच्या धार्मिक,सामाजिक आणि आर्थिक विकासाला नवी दिशा मिळणार असून,महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासाच्या दृष्टीने हा एक मैलाचा दगड ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.