Ticker

6/recent/ticker-posts

१ हजार विडींना ३६१ रुपये मजुरीची तातडीने अंमलबजावणी करा; विडी उद्योग संघाला हक्क समितीचे निवेदन


सोलापुरातील सर्व विडी कामगारांना शासनाने जाहीर केलेला दर मिळावा; गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची मागणी

सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विडी कामगारांसाठी १ हजार विडींमागे ३६१ रुपये मजुरी देण्याबाबत आदेश जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर, सोलापुरातील सर्व विडी कामगारांना शासनाने जाहीर केलेली मजुरी तातडीने लागू करण्यात यावी,अशी मागणी विडी कामगार किमान वेतन हक्क व कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात समितीचे डॉ.गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोलापूर विडी उद्योग संघाला निवेदन दिले. विडी उद्योग संघाचे श्रीदेवा शेठ साबळे यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द करण्यात आले.

निवेदनात नमूद केल्यानुसार,०३ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सोलापूर शहरातील विडी कामगारांना दर हजार विडींमागे ३६१ रुपये मजुरी देण्याबाबत आदेश/परिपत्रक जाहीर केले आहे. 

शासनाने जाहीर केलेल्या या दराची सर्व विडी कारखान्यांमध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे समितीने म्हटले आहे.

सोलापुरातील सर्व विडी कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे १ हजार विडींना ३६१ रुपये मजुरी त्वरित मिळावी, तसेच संबंधित कारखानदारांना त्याची अंमलबजावणी करण्याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

कामगारांच्या किमान वेतनाच्या हक्काची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि शासनाने जाहीर केलेला मजुरीचा दर कामगारांना प्रत्यक्ष मिळावा,यासाठी समिती पुढील काळातही पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.