Ticker

6/recent/ticker-posts

ग्रंथालय दिनानिमित्त २५० विद्यार्थिनींची ‘उर्दू घर’ वाचनालयास शैक्षणिक भेट


सोलापूर : डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त १२ ऑगस्ट रोजी देशभरात ग्रंथालय दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून बेगम कमरुन्निसा कारीगर गर्ल्स हायस्कूल ॲड.ज्युनिअर कॉलेज,सोलापूर येथील सुमारे २५० विद्यार्थिनींनी सोलापूर शहरातील ‘उर्दू घर’ येथे शैक्षणिक व अभ्यासपूर्ण भेट दिली.

या भेटीदरम्यान विद्यार्थिनींनी ‘उर्दू घर’मधील ग्रंथालय तसेच विविध शैक्षणिक व अभ्यासाच्या सुविधांची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी उपलब्ध असलेला स्वतंत्र विभाग, महिलांसाठीची वाचनाची व्यवस्था,स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपलब्ध सुविधा,तसेच सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांसाठी असलेले सभागृह व ऑडिटोरियम यांची विद्यार्थिनींनी माहिती घेतली. ‘उर्दू घर’च्या सदस्यांनी विद्यार्थिनींना ग्रंथालयाचे महत्त्व, पुस्तक वाचनाचे फायदे आणि उपलब्ध सुविधांचा उपयोग करण्याच्या पद्धतीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.


‘उर्दू घर’च्या ऑडिटोरियममध्ये ‘उर्दू घर’ आणि बेगम कमरुन्निसा कारीगर गर्ल्स हायस्कूल ॲड.ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी आनिया अनीस बागबान हिच्या पवित्र कुरआन पठणाने झाली. त्यानंतर आफिया शेख व खदीजा शेख यांनी ग्रंथालयाचे महत्त्व व उपयुक्तता अधोरेखित करणारी कविता सादर केली.

यावेळी अफिफा शेख,सायमा शेख आणि आफिया शेख यांनी ‘उर्दू घर’ व ग्रंथालयासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनींनी पुस्तक, वाचन आणि ग्रंथालयांचे शैक्षणिक व बौद्धिक महत्त्व स्पष्ट करत ही भेट अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरल्याचे सांगितले.

डॉ.मोहम्मद शफी चोबदार,डॉ.हारून रशीद बागबान आणि अब्दुल मजीद यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. त्यांनी ग्रंथालय दिनाचे महत्त्व व उपयुक्तता स्पष्ट करून ‘उर्दू घर’च्या ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या विविध पुस्तकांची माहिती विद्यार्थिनींना दिली.

या प्रसंगी बेगम कमरुन्निसा कारीगर गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने ‘उर्दू घर’चे सदस्य डॉ.मोहम्मद शफी चोबदार,डॉ.हारून रशीद बागबान,अब्दुल मजीद सर तसेच ग्रंथपाल साहिर नदाफ यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


‘उर्दू घर’चे ग्रंथपाल साहिर नदाफ यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका तहसीन शेख,ग्रंथालय प्रमुख तबस्सुम शाह मलिक,अनीसा नलबंद, मोहम्मद इरफान डोका,युनूस बालगी, शाहीन आपा,गुलनार आपा,शहनाज आपा,नुसरत आपा तसेच सर्व विद्यार्थिनींचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांनी ‘उर्दू घर’मधील विविध विभागांची तसेच ग्रंथालयातील उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेची विद्यार्थिनींना माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद इरफान डोका यांनी केले. ग्रंथालय दिनानिमित्त आयोजित या शैक्षणिक भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींमध्ये पुस्तकप्रेम,वाचनाची आवड आणि ग्रंथालयाचा नियमित उपयोग करण्याची प्रवृत्ती निर्माण करणे हा होता. विद्यार्थिनी व उपस्थितांनी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त,ज्ञानवर्धक आणि उद्देशपूर्ण शैक्षणिक उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले.