Ticker

6/recent/ticker-posts

श्रावणी सोमवारनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक-सिद्धेश्वर मंदिर मार्गावरील बॅरिकेड्स हटवा

श्रावणी सोमवारनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक-सिद्धेश्वर मंदिर मार्गावरील बॅरिकेड्स हटवा; पार्क रोड शोरूम्स असोसिएशनची पोलिस आयुक्तांकडे मागणी

सोलापूर : श्रावणी सोमवारनिमित्त सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर लावण्यात आलेले बॅरिकेड्स व वाहतूक निर्बंधांमुळे व्यापारी, कामगार तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पार्क रोड शोरूम्स असोसिएशनने म्हटले आहे. याबाबत असोसिएशनने सोलापूरचे पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन वाहतुकीसाठी मार्ग शक्य तितक्या लवकर खुला करण्याची मागणी केली आहे.

पार्क रोड शोरूम्स असोसिएशनचे अध्यक्ष केतनभाई शाह यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रावणी सोमवारनिमित्त सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.



या निर्णयामुळे पार्क रोड परिसरातील असोसिएशनच्या सभासदांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची ये-जा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. तसेच दुकानांमध्ये बंद ठेवण्याची वेळ वाढत असून,सुमारे २०० दुकानदार व कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

वाहतूक सुरक्षेसोबत व्यापाऱ्यांचाही विचार करावा
निवेदनात पुढे म्हटले आहे की, वाहतूक पोलिसांचे प्रमुख काम वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवणे हे आहे. मात्र, बॅरिकेड्स लावून संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे व्यापारी, कामगार आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

होम मैदान रिकामे असताना वाहने रस्त्यावर पार्क करण्यास परवानगी दिली जाते का? असा सवालही असोसिएशनने उपस्थित केला आहे. वाहतुकीचे नियोजन करताना उपलब्ध पर्यायी जागांचा वापर करून व्यापारी आणि नागरिकांना दिलासा द्यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.



तातडीने पाहणी करून मार्ग खुला करण्याची मागणी - या प्रश्नाकडे पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पाहणी करावी. सर्व वाहने होम मैदान तसेच त्यासमोरील उपलब्ध जागेत पार्क करण्याची व्यवस्था करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते सिद्धेश्वर मंदिराकडील मार्ग शक्य तितक्या लवकर वाहतुकीसाठी खुला करावा,अशी विनंती असोसिएशनने केली आहे.

दरम्यान, मागणीची दखल न घेतल्यास असोसिएशनच्या सर्व सभासदांना नाईलाजास्तव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष - श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता,वाहतूक व्यवस्थापन आणि स्थानिक व्यापाऱ्यांचे व्यवसायिक हित या तिन्ही बाबींचा समतोल साधण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे. पार्क रोड शोरूम्स असोसिएशनच्या मागणीवर पोलीस प्रशासन काय निर्णय घेते,याकडे व्यापारी तसेच नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पार्क रोड शोरूम्स असोसिएशनचे अध्यक्ष केतन शाह यांनी पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून सहकार्य करावे,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.