नागपूर : अल्पसंख्याक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या उत्तम संधी उपलब्ध व्हाव्यात आणि आर्थिक अथवा तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये,यासाठी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग सातत्याने प्रयत्नशील आहे,अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक सहकार्य करण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागपूर येथील गुणवंत विद्यार्थी जाफर नक्वी याला ब्रिटनमधील ब्रिस्टल विद्यापीठाच्या एम.एस्सी.सायबर सिक्युरिटी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे. मात्र, त्याच्या शिष्यवृत्ती प्रक्रियेदरम्यान काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे त्याच्या उच्च शिक्षणासमोर अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती.
ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित अधिकारी आणि यंत्रणांशी चर्चा करून समन्वय साधण्यात आला. त्यानंतर शिष्यवृत्ती प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करण्यात यश आले असून,जाफर नक्वीची शिष्यवृत्ती अखेर मंजूर झाली आहे.
जाफरच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणि परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधीला मिळालेला हा पाठिंबा इतर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.
आर्थिक परिस्थिती किंवा प्रशासकीय प्रक्रियेतील अडचणींमुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला खीळ बसू नये, यासाठी आवश्यक त्या पातळीवर प्रयत्न केले जातील, असे प्यारे खान यांनी स्पष्ट केले.
जाफर नक्वीच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून,त्याच्या उज्ज्वल शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
