सोलापूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशानुसार समाजामध्ये कायदेविषयक जनजागृती वाढविणे,सर्वसामान्य नागरिकांना विधी सेवेची माहिती उपलब्ध करून देणे तसेच विविध कायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सोलापूर मार्फत विविध विधी विषयक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमांद्वारे पात्र धारकांना नि:शुल्क विधी सेवा, बालकांचे हक्क,पोक्सो कायदा,महिलांचे हक्क,ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार,सायबर गुन्हे,मध्यस्थी,संविधानिक हक्क,व्यसनमुक्ती,बालविवाह प्रतिबंध,कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध आदी विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मोफत मार्गदर्शन करण्यात येते.
यासंदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सोलापूरचे सचिव तथा न्यायाधीश अमोलकुमार अ. देशपांडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळा,महाविद्यालये,शासकीय व निमशासकीय कार्यालये,ग्रामपंचायती,स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट,सामाजिक संस्था तसेच विविध संघटनांना आवाहन केले आहे की,आपल्या संस्थेमध्ये विधी सेवा विषयक निःशुल्क जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा.
अशा जनजागृती कार्यक्रमांमुळे नागरिकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास,त्यांच्या हक्क व कर्तव्यांची जाणीव वाढण्यास तसेच पात्र लाभार्थ्यांना नि:शुल्क विधी सेवेचा लाभ मिळण्यास मोठी मदत होत असल्याचे प्रतिपादन अमोलकुमार अ.देशपांडे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सोलापूर प्रत्येक शाळा व महाविद्यालय प्रशासनासोबत संपर्क करणार असले तरी ह्या प्रसिद्धीकरणाद्वारे आवाहन करण्यात येत आहे की,इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सोलापूर (जिल्हा न्यायालय सोलापूर आवार) कार्यालयाशी किंवा 85919 03613 या क्रमांकावर संपर्क साधावा.
