सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश; न्यायालयाने जामीन अर्ज केला मंजूर
सोलापूर : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा तसेच तिचे खासगी फोटो नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या आरोपीस सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.आर.उबाळे यांनी दिनांक १७ जुलै २०२६ रोजी नियमित जामीन अर्ज क्र. ६२६/२०२६ वर आदेश देत आरोपी पियुष प्रताप पवार (वय २०,रा.चिंचोळी काटी,ता. मोहोळ,जि.सोलापूर) याचा जामीन अर्ज मंजूर केला.
या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशन,सोलापूर येथे दिनांक ६ मे २०२६ रोजी गु.र.क्र. ३५३/२०२६ दाखल करण्यात आला होता. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ६९, ३१८(४) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रेमसंबंध असल्याचा फिर्यादीचा जबाब - फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच,फिर्यादीचे आरोपीच्या मोबाईलमध्ये काढलेले खासगी फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी दिल्याचेही जबाबात नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर मध्यस्थांमार्फत साखरपुडा करून लग्न करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र,सदर लग्न झाले नसल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
२१ जून रोजी आरोपीला अटक - सदर गुन्ह्यात आरोपी पियुष प्रताप पवार यास दिनांक २१ जून २०२६ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज क्र. ६२६/२०२६ दाखल केला होता.
बचाव पक्षाचा युक्तिवाद - जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी यांनी युक्तिवाद केला. आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. संबंध सुरू झाल्यापासूनच आरोपीचा फिर्यादीशी लग्न करण्याचा हेतू नव्हता, ही बाब अद्याप सिद्ध झालेली नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.
तसेच, या प्रकरणातील पोलिस तपास पूर्ण झालेला असून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपीच्या ताब्यातून कोणतीही वस्तू जप्त करणे अथवा पुढील तपासासाठी आरोपीची कोठडी आवश्यक नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
या सर्व बाबींचा विचार करून आरोपीस जामीन मंजूर करावा,अशी मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली.
न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर - दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी दिनांक १७ जुलै २०२६ रोजी नियमित जामीन अर्ज क्र. ६२६/२०२६ मंजूर केला. त्यानुसार आरोपी पियुष प्रताप पवार यास सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.
या प्रकरणातील जामीन मंजुरीचा आदेश हा न्यायालयीन प्रक्रियेतील एक टप्पा असून,जामीन मिळणे म्हणजे आरोपी दोषमुक्त ठरला असा अर्थ होत नाही. प्रकरणातील आरोपांचे अंतिम परीक्षण न्यायालयीन खटल्यात होणार आहे.
आरोपीतर्फे या वकिलांनी पाहिले काम सदर प्रकरणात - आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी,ॲड.वैभव बोंगे,ॲड.पैगंबर सय्यद,ॲड.ओंकार फडतरे,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड.मोहीम पठाण,ॲड.मनिष बाबरे,ॲड.रोहित थोरात,ॲड.अजय वाघमारे,ॲड.त्वरिता वाघ,ॲड.सलामत पटेल,ॲड.संकेत पवार,ॲड.प्रदिप गायकवाड आणि ॲड.सागर स्वामी यांनी काम पाहिले.
