Ticker

6/recent/ticker-posts

पावसाची तमा न बाळगता भिजत सोलापूर विकास मंचाचे आंदोलन; विकासाच्या मागण्यांसाठी बुलंद आवाज


सोलापूरच्या विकासासाठी एल्गार; विकास मंचच्या आंदोलनाला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विमानसेवा,नाईट लँडिंग,नियमित पाणीपुरवठा,बससेवा, ५४ मीटर रस्ता, IT पार्कसह प्रलंबित प्रश्नांवर नागरिकांचा बुलंद आवाज

सोलापूर : सोलापूर शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार अर्थात पूनम गेट येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण व तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत झालेल्या या आंदोलनाला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सोलापूरच्या विकासाच्या विविध प्रश्नांवर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपला आवाज बुलंद केला. विमानसेवा, नाईट लँडिंग, नियमित पाणीपुरवठा,सक्षम शहर बससेवा आणि रखडलेल्या विविध विकासकामांबाबत आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

होटगी रोड विमानतळासाठी नाईट लँडिंगची मागणी
होटगी रोड विमानतळावरील विमानसेवा सुरळीत आणि कायमस्वरूपी राहण्यासाठी नाईट लँडिंगची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. सोलापूरच्या औद्योगिक,व्यापारी,पर्यटन आणि शैक्षणिक विकासासाठी नियमित विमानसेवा अत्यंत महत्त्वाची असल्याचे मंचाच्या वतीने सांगण्यात आले.

नियमित पाणीपुरवठा आणि सक्षम बससेवेचा मुद्दा
सोलापूर शहरातील नागरिकांना नियमित आणि ठरावीक वेळेत पाणीपुरवठा करण्यात यावा,अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. त्याचबरोबर शहरातील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करून नागरिकांसाठी प्रभावी आणि विश्वासार्ह शहर बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.

५४ मीटर रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी
छत्रपती संभाजी महाराज चौक ते सोरेगाव या ५४ मीटर रस्त्याचे रखडलेले काम तातडीने सुरू करावे,अशी मागणी करण्यात आली. तसेच कंबर तलाव–पत्रकार भवन पुलाचे रुंदीकरण करण्याची मागणीही मंचाने प्रशासनासमोर मांडली.

हद्दवाढ भागातील मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी
सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढ भागातील नागरिकांना अद्यापही विविध मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. या भागात रस्ते, पाणी,ड्रेनेज,सार्वजनिक वाहतूक आणि इतर नागरी सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.


IT Parkसह रोजगारनिर्मितीवर भर - सोलापूरमध्ये रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी IT Park उभारण्यासाठी जागा आरक्षित करून त्याची उभारणी करण्याची प्रक्रिया सुरू करावी,अशी मागणी करण्यात आली. यासोबतच शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज,महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि मिलेट सेंटर सुरू करावे,अशी मागणीही करण्यात आली.

शहरातील वाहतूक आणि पुलांच्या प्रश्नांकडेही लक्ष
शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि अशास्त्रीय पद्धतीने उभारण्यात आलेले स्पीड ब्रेकर यामुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करण्याची मागणी करण्यात आली. तसेच दमाणी नगर-मरिआई चौक पूल आणि आसरा पूल यांसह शहरातील महत्त्वाच्या वाहतूक सुविधांच्या प्रश्नांवरही आंदोलनातून आवाज उठविण्यात आला.

दूषित पाणी, रेल्वे सुविधा आणि रात्रीच्या रेल्वेसेवेची मागणी
शहरातील काही भागांमध्ये दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ व ७ चा विस्तार करण्याबरोबरच सोलापूर–कोल्हापूर रात्रीची रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.


महापालिकेच्या कामांमध्ये पारदर्शकतेसाठी डिजिटल डॅशबोर्ड - महानगरपालिकेच्या विकासकामांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल डॅशबोर्ड उभारण्यात यावा, अशी मागणी सोलापूर विकास मंचने केली. कोणते काम सुरू आहे, त्यासाठी किती निधी मंजूर झाला, कामाची सद्यस्थिती काय आहे आणि काम पूर्ण होण्याची मुदत किती आहे, याची माहिती नागरिकांना ऑनलाइन उपलब्ध व्हावी, अशी भूमिका मंचाच्या वतीने मांडण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला महत्त्व
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित २० ऑगस्टच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सोलापूरच्या विकासाचे प्रश्न केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता त्यावर ठोस, कालबद्ध आणि परिणामकारक कार्यवाही झाली पाहिजे, अशी अपेक्षा आंदोलनात सहभागी नागरिकांनी व्यक्त केली.

“सोलापूरच्या विकासासाठी पक्ष,गट आणि मतभेद बाजूला ठेवून नागरिकांनी एकत्र येणे हीच या आंदोलनाची मोठी ताकद आहे,” अशी भूमिका सोलापूर विकास मंचच्या वतीने मांडण्यात आली.

आंदोलनाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा - सोलापूरकरांच्या प्रलंबित विकासप्रश्नांबाबत असलेल्या तीव्र भावनेचे प्रतीक असल्याचे मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आता शासन आणि प्रशासन या मागण्यांवर काय ठोस निर्णय घेते आणि किती कालावधीत कार्यवाही करते, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

विविध मान्यवरांचा सहभाग - या आंदोलनात सोलापूर विकास मंचचे सदस्य आनंद पाटील,सुहास भोसले,धनश्याम दायमा,प्रा.प्रसन्न नाझरे,केतन शहा,मिलिंद भोसले,योगीन गुर्जर,विजय कुंदन जाधव,मनोज क्षीरसागर,ॲड.दत्तात्रय अंबुरे,जयश्री तासगावकर,शुभदा पाटील, शफीक काझी यांच्यासह सोलापूर शहरातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवर,नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सोलापूरच्या विकासासाठी आता आश्वासन नव्हे,तर ठोस निर्णय आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी,हीच आंदोलनाची प्रमुख मागणी ठरली.