सोलापूर महानगरपालिकेतील कामकाज,निर्णय, नागरिकांच्या समस्या आणि सार्वजनिक महत्त्वाची माहिती संकलित करून ती निर्भीडपणे व पारदर्शकपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यात यू-ट्यूब व डिजिटल माध्यमांची भूमिका आज अत्यंत महत्त्वाची झाली आहे. डिजिटल युगात पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. पारंपरिक वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांसोबतच यू-ट्यूब,फेसबुक,व्हॉट्सॲप आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवरून बातम्या व माहिती जनतेपर्यंत पोहोचत आहे. अशा स्थितीत पत्रकारितेवर जणू आमचीच 'मक्तेदारी' या अविर्भावात वागणारा पारंपारिक वृत्तपत्रातला बातमीदार वर्ग आपल्या नजरेचा बुरसट दृष्टीकोन बदलण्याच्या मन:स्थितीत नसल्याचा प्रत्यय पदोपदी येतो आहे. त्या 'अँगल' मधून डिजिटल माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांकडे तुच्छतेने पाहणे किंवा त्यांना कमी लेखणे निश्चितच योग्य वाटत नाही.
सोलापूर महानगरपालिकेसारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक संस्थेतील घडामोडी जनतेपर्यंत तात्काळ पोहोचविण्याचे काम अनेक डिजिटल पत्रकार प्रामाणिकपणे करत आहेत.
नागरिकांना प्रत्यक्ष माहिती मिळावी,प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता राहावी आणि जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जावेत,यासाठी डिजिटल पत्रकारितेचे योगदान महत्त्वाचे आहे.
डिजीटल युगात संपूर्ण विश्व सेकंदा-सेंकदाला अपडेट होत असताना महत्वाची माहिती वा बातमी पाहण्यासाठी उद्या सकाळपर्यंत थांबण्याची आजच्या पिढीची तयारी नाही. त्यामुळं टी.व्ही. प्रसारमाध्यमं आणि सामाजिक माध्यमं, यू-ट्यूब, फेसबुक आणि डिजीटल प्लॅटफॉर्मवरील बातम्या/महितीला जगाच्या कोणत्याही ठिकाणावरुन प्रतिसाद मिळतो आहे.
आज यूट्यूबवरून लाखो लोक बातम्या पाहतात. अनेक पत्रकार, वृत्तसंस्था आणि नागरिक याच माध्यमातून आपला आवाज जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. त्यामुळे पारंपारिक वृत्तपत्राच्या 'वर्तुळा' संपूर्ण विश्व समजणारा ' वर्ग ' ठराविक मानसिकतेत वावरत असल्याचं दिसतंय. त्या वर्गानं डिजिटल पत्रकारितेला दुय्यम समजण्याचा किंवा यूट्यूबला तुच्छ लेखण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.
विशेष म्हणजे,जे पत्रकार डिजिटल माध्यमांवर टीका करतात,त्यांनी स्वतःच्या पत्रकारितेतील बदलत्या काळाचे भान ठेवणे आवश्यक आहे. यू-ट्यूब,फेसबुक,व्हॉट्सॲप किंवा इतर डिजिटल माध्यमांचा वापर चुकीचा वाटत असेल, तर अशा माध्यमांचा स्वतःही वापर न करता,स्व:ताची भूमिका निश्चित घ्यावी. स्वतः डिजिटल माध्यमांचा वापर करायचा आणि इतरांच्या डिजिटल पत्रकारितेकडे तुच्छतेने पाहायचे,ही भूमिका,दुसऱ्याचं ते 'कार्ट' सारखीच दिसते. त्यांच्या कानगोष्टी वा अनाहुत सल्ले देण्यातून ही दुटप्पी भूमिका दिसून येते.
पत्रकारिता ही कोणत्याही एका माध्यमाची मक्तेदारी नाही. पत्रकारिता म्हणजे जनतेचा आवाज,सत्य मांडण्याचे माध्यम आणि लोकशाहीतील महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. माध्यम कोणते आहे. वर्तमानपत्र,टीव्ही,यू-ट्यूब किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म यापेक्षा बातमी किती सत्य,जबाबदार,पारदर्शक आणि जनहिताची आहे,हे महत्त्वाचे आहे.
त्यामुळे डिजिटल पत्रकारांना कमी लेखणाऱ्या आणि यू-ट्यूबकडे तुच्छतेच्या नजरेने पाहणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध!
डिजिटल पत्रकारिता जिंदाबाद !
जनतेच्या प्रश्नांची पत्रकारिता जिंदाबाद !!
@ सैफन शेख,सोलापूर.
