शांतता समितीच्या बैठकीत पोलिसांच्या स्पष्ट सूचना; धार्मिक स्थळांसमोर नाच-गाणी,आक्षेपार्ह वस्तू फेकणे व सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यास मनाई
सोलापूर : ईद-ए-मिलाद अर्थात मोहम्मद पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक तयारी सुरू केली आहे. ईद-ए-मिलाद उत्सव शांततेत, सामंजस्याने आणि कायद्याच्या चौकटीत साजरा करण्याचे आवाहन करताना विनापरवाना मिरवणूक काढणाऱ्यांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला.
यासंदर्भात पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) वृष्टी जैन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात ईद-ए-मिलाद २०२६ शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस पोलीस अधिकारी,शांतता समितीचे सदस्य,सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी तसेच ईद-ए-मिलाद उत्सवाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
बैठकीची प्रस्तावना पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ.अश्विनी पाटील यांनी केली. ईद-ए-मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली.
विनापरवाना मिरवणुकीला स्पष्ट मनाई - ईद-ए-मिलादच्या निमित्ताने कोणीही विनापरवाना मिरवणूक काढू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले. मिरवणुकीच्या मार्गावरील धार्मिक स्थळांबाबत विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विशेषतः लहान-मोठ्या मंदिरांसमोर नाच-गाणी करू नयेत तसेच कोणत्याही धार्मिक स्थळावर आक्षेपार्ह वस्तू फेकू नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. उत्सव साजरा करताना सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीला किंवा नागरिकांच्या दैनंदिन हालचालींना अडथळा निर्माण होणार नाही,याची काळजी घेण्याचे आवाहनही पोलिसांनी केले.
अफवांवर विश्वास ठेवू नका; सोशल मीडियावरही पोलिसांची नजर - शहरातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये. एखादी अफवा किंवा अनुचित माहिती मिळाल्यास ती पुढे प्रसारित न करता पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
तसेच सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मेसेज,फोटो,व्हिडिओ किंवा इतर मजकूर फॉरवर्ड करू नये. असा मजकूर आढळल्यास तो पुढे प्रसारित न करता डिलीट करावा आणि जातीय सलोखा व सामाजिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागावे,असे पोलिसांनी सांगितले.
धार्मिक स्थळांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य टाळा - कोणत्याही धार्मिक स्थळी आक्षेपार्ह भाष्य अथवा वक्तव्य केले जाणार नाही, याची संबंधितांनी खबरदारी घ्यावी. कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील,अशा प्रकारचे कृत्य होणार नाही यासाठी उत्सवाचे पदाधिकारी,शांतता समिती सदस्य आणि नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी,असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
अनुचित प्रकार दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या
परिसरात कोणतीही अप्रिय, संशयास्पद अथवा चुकीची घटना घडत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी स्वतः कायदा हातात न घेता तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे अथवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे निर्देश देण्यात आले.
बैठकीदरम्यान शांतता समितीच्या सदस्यांनी तसेच इतर उपस्थितांनी उत्सवाच्या अनुषंगाने विविध समस्या आणि सूचना मांडल्या. त्यावर संबंधित महानगरपालिका, महावितरण,आरटीओ आदी विभागांच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही करून समस्या सोडविण्याची ग्वाही दिली.
कायदा हातात घेतल्यास कारवाईचा इशारा - पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीत मांडण्यात आलेल्या अडचणींचे निरसन केले. उत्सव साजरा करताना अनेकदा कायदेशीर बाबींचे उल्लंघन होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
मिरवणुकीदरम्यान अफवा पसरवू नयेत,शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि आपल्या परिसरातील कोणत्याही बेकायदेशीर बाबीची माहिती पोलिसांना द्यावी,असेही आवाहन करण्यात आले.
सोलापूर पोलिसांकडून योग्य बंदोबस्ताचे आश्वासन
ईद-ए-मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून उत्सव शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा करावा,असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) वृष्टी जैन, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ.अश्विनी पाटील,पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) प्रताप याकलकर,पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) विजयालक्ष्मी कुंभार,सहायक पोलीस आयुक्त, महापालिका व महावितरणचे अधिकारी,आरटीओ अधिकारी,विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी,शांतता समितीचे सदस्य व पत्रकार उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी शांतता समितीच्या सदस्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ईद-ए-मिलाद २०२६ हा उत्सव शांतता,बंधुभाव आणि सामाजिक सलोखा राखत पार पाडण्यासाठी सोलापूर पोलिसांनी सर्व नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
