जिल्हा न्यायालयात रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न; ११९ जणांचे रक्तदान, १३१ जणांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ
सोलापूर : रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून माणसानी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपसावी असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सोलापूर आणि धर्मादाय कार्यालय,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने जिल्हा न्यायालय,सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेले रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या शिबिराला न्यायालयीन अधिकारी,विधिज्ञ,न्यायालयीन कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बला चे जवान तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात एकूण ११९ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. यामध्ये डॉ.हेडगेवार रक्तपेढी व अश्विनी रक्तपेढी यांनी रक्तसंकलन केले.
यासोबतच १३१ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. आरोग्य तपासणी यशोधरा हॉस्पिटल व अश्विनी हॉस्पिटल यांनी केले.
शिबिरामध्ये ECG तपासणीचा ९२ नागरिकांनी लाभ घेतला. तसेच CBC, BSL आणि Serum Creatinine या तपासण्यांचा ७३ नागरिकांनी लाभ घेतला.
शिबिराचे उदघाट्न सोलापूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज एस.शर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळी धर्मादाय उपायुक्त ईश्वर सूर्यवंशी,मुख्यालयातील न्यायाधीश,न्यायालयीन अधिकारी,विधिज्ञ,कर्मचारी व संबंधित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोलकुमार अ. देशपांडे यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी रक्तदान हे केवळ सामाजिक योगदान नसून एखाद्याच्या जीवनाला नवसंजीवनी देण्याचे कार्य आहे. निरोगी नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्याचबरोबर नियमित आरोग्य तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे,असे स्पष्ट केले.
शिबिरामध्ये रक्तदानासोबतच विविध आरोग्य तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांना एकाच ठिकाणी रक्तदान आणि आरोग्यविषयक प्राथमिक तपासणीचा लाभ मिळाला.
या उपक्रमासाठी अश्विनी हॉस्पिटल,यशोधरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ.हेडगेवार रक्तपेढी आणि अश्विनी ब्लड बँक, सोलापूर यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,धर्मादाय कार्यालय,जिल्हा न्यायालय प्रशासन, संबंधित वैद्यकीय संस्था,रक्तपेढ्या,अधिकारी-कर्मचारी तसेच स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
