Ticker

6/recent/ticker-posts

बादोलेच्या जानकर बंधूंची नीट परीक्षेत घवघवीत कामगिरी; ग्रामीण भागातून यशाचा नवा आदर्श


अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील बादोले बुद्रुक येथील समर्थ सुभाष जानकर आणि श्रीकांत सुभाष जानकर या दोन्ही बंधूंनी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. समर्थ जानकर यांनी ५२० गुण, तर श्रीकांत जानकर यांनी ५६३ गुण मिळवत उज्ज्वल यशाची नोंद केली.

बादोलेसारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या मर्यादित कुटुंबातून पुढे आलेल्या या दोन्ही बंधूंनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. एकाच घरातील दोन बंधूंनी एकाचवेळी नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून गावकऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


या यशामुळे बादोले गावाचे नाव अक्कलकोट तालुक्यात अभिमानाने झळकले आहे. मुलांच्या यशामुळे त्यांच्या आई-वडिलांनाही अत्यानंद झाला असून,प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करून मुलांनी मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.





यावेळी समर्थ आणि श्रीकांत जानकर यांनी सांगितले की, "कठोर परिश्रम, वेळेचे योग्य नियोजन, ध्येय, जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही यश अशक्य नाही. आजच्या तरुणांनी मोबाईलच्या आहारी न जाता शिक्षणावर लक्ष केंद्रित करून स्वतःसह आई-वडिलांचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे."

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जानकर बंधूंचे हे यश निश्चितच प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.