नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी समाज,कुटुंब आणि युवा पिढीला उद्देशून महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,आजचा युवक भरकटलेला नाही. त्याला केवळ आदेश देण्याऐवजी तर्क,विश्वास,प्रेम आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.
विश्व मांगल्य सभेच्या कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले की,युवकांशी संवाद साधताना त्यांना समजून घेणे अधिक आवश्यक आहे. बदलत्या काळात नव्या पिढीचे विचार ऐकून त्यांना योग्य दिशा दिल्यास देशाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहील.
यावेळी त्यांनी मातृत्वाच्या भूमिकेवरही विशेष भर दिला. समाजाची निर्मिती,संगोपन आणि संस्कार यांचा पाया मातृत्वात आहे. मातृत्वाशिवाय समाजाची उभारणी आणि मानवजातीचे अस्तित्व शक्य नाही,असे त्यांनी नमूद केले. कुटुंबव्यवस्था,संस्कार आणि सामाजिक मूल्ये टिकविण्यात आईची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
मोहन भागवत यांनी समाजात परस्पर विश्वास,संवाद आणि सकारात्मक विचारांची गरज अधोरेखित केली. युवकांना दोष देण्याऐवजी त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना योग्य वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रत्येक कुटुंब,शिक्षक आणि समाजाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
