Ticker

6/recent/ticker-posts

एका कुंचल्यातून बदलले लाखो आयुष्य; रुबल नागी यांना 'ग्लोबल टीचर प्राइज 2026'चा सन्मान


मुंबई : रंग, कला आणि सर्जनशीलता यांच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा ध्यास घेतलेल्या प्रसिद्ध कलाकार रुबल नागी यांनी आपल्या सामाजिक कार्यातून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. एका कुंचल्यात आयुष्य बदलण्याची ताकद असते,या विश्वासातून त्यांनी सुरू केलेल्या कार्यामुळे आज दीड लाखांहून अधिक घरांचे रूप पालटले असून वंचित मुलांसाठी ८०० हून अधिक शिक्षण केंद्रे उभारण्यात आली आहेत.

रुबल नागी या केवळ समकालीन कलाकार नसून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे प्रभावी नेतृत्व करणाऱ्या व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी स्थापन केलेल्या रुबल नागी आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण,महिला सक्षमीकरण,झोपडपट्टी विकास,कौशल्य प्रशिक्षण आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवले आहेत.




त्यांच्या उपक्रमांमुळे हजारो मुलांना शिक्षणाची संधी मिळाली,महिलांना स्वावलंबनाचा मार्ग सापडला आणि अनेक वस्त्यांचे रूप पालटले. कला ही केवळ प्रदर्शनासाठी नसून समाज बदलण्याचे प्रभावी साधन ठरू शकते,हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली असून, 'ग्लोबल टीचर प्राइज 2026' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. हा सन्मान त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा जागतिक स्तरावर झालेला गौरव मानला जात आहे.

रुबल नागी यांचा हा प्रवास प्रत्येक कलाकार,शिक्षक आणि समाजसेवकासाठी प्रेरणादायी ठरत असून,राष्ट्रनिर्मितीत सर्जनशीलतेची ताकद किती प्रभावी असू शकते,याचे ते जिवंत उदाहरण आहेत.