सोलापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MSEB) विभागाचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक (MD) औंडीकर यांच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त बालाजी सरोवर येथे सोलापूर आदिवासी पारधी समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांच्या हस्ते औंडीकर यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आले.
सत्कार समारंभादरम्यान आदिवासी पारधी समाजातील रोजगाराचा प्रश्न औंडीकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. समाजातील अनेक तरुण-तरुणींनी शासनमान्य आयटीआय परीक्षा उत्तीर्ण होऊन एमएसईबी विभागात इलेक्ट्रिशियन अप्रेंटिसशिप पूर्ण केली आहे. मात्र,दोन ते तीन वर्षांचा कालावधी उलटूनही त्यांना अद्याप कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळालेली नसल्याने त्यांच्यासमोर बेरोजगारी व उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे.
या संदर्भात यापूर्वी 9 जून 2025 रोजी भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन सादर केले होते. त्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी एमएसईबी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. मात्र,त्यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नव्हती. दरम्यान, ही बाब एमएसईबीचे प्रमुख औंडीकर यांच्या समोर मांडण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांना संबंधित आदिवासी पारधी समाजातील पात्र तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
औंडीकर यांच्या या निर्देशांमुळे आयटीआय व इलेक्ट्रिशियन अप्रेंटिसशिप पूर्ण केलेल्या आदिवासी पारधी समाजातील युवक-युवतींना नोकरीची संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी समाजाच्या रोजगाराच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांच्या प्रयत्नांचे उपस्थितांनी कौतुक केले.
सत्कार समारंभास सामाजिक कार्यकर्ते अनिल भि. चव्हाण, सिद्धाराम चव्हाण, सुमित चव्हाण, आशुतोष चव्हाण यांच्यासह पारधी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
