Ticker

6/recent/ticker-posts

जबरी चोरी व गंभीर मारहाण प्रकरणातील दोन आरोपींना जामीन मंजूर


सोलापूर : मंद्रूप पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरी व गंभीर मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शिलवंत यांनी अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला आहे.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार,काही व्यक्तींनी वाहन अडवून फिर्यादीस गंभीर मारहाण केली व त्याच्याकडील मोठी रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम ३०९(६) व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक १४२/२०२६ दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी आनंद भरत गावडे (वय २९,रा.भीमनगर,भंडारकवठे,सोलापूर) व आशिष मलसिद्ध कांबळे (वय २५,रा.उल्हासनगर,ठाणे) यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते.





जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने आरोपींविरुद्ध कोणताही ठोस व थेट पुरावा उपलब्ध नसल्याचा युक्तिवाद केला. तसेच तपासासाठी आरोपींच्या पुढील कोठडीची आवश्यकता नसून ते तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. आरोपी हे कायमस्वरूपी पत्त्यावर वास्तव्यास असून ते पळून जाण्याची किंवा पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करण्याची शक्यता नसल्याचेही बचाव पक्षाने नमूद केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शिलवंत यांनी आरोपींना योग्य त्या अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला.

या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड.कदीर औटी,ॲड. वैभव बोंगे,ॲड.ओंकार फडतरे,ॲड.अजय वाघमारे,ॲड. शिवरत्न वाघ,ॲड.मोहीम पठाण,ॲड.मनिष बाबरे,ॲड. रोहित थोरात,ॲड.संकेत पवार आणि ॲड.त्वरिता वाघ यांनी काम पाहिले.