सोलापूर : पॉक्सो कायदा, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम तसेच भारतीय दंड संहिता अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी सविता सुरेश चव्हाण (वय ५५, रा. शिवाजीनगर तांडा, केगाव, जि. सोलापूर) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर येथे ११ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हा क्रमांक ६९/२०२५ अंतर्गत सुरेश शोभराज चव्हाण,किरण सुरेश चव्हाण,नितीन सुरेश चव्हाण, सविता सुरेश चव्हाण आणि कविता हरिश्चंद्र चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा भारतीय दंड संहिता, १८६० मधील कलम ३७६(२)(एन, आय, जे), ३२३, ५०४, ५०६ व ३४ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पॉक्सो) अधिनियम, २०१२ मधील कलम ४ व ६ आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियमातील कलम ९ व ११ अंतर्गत नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार,तिच्या मोठ्या बहिणीने सासरचे घर सोडल्यानंतर तिच्यावर बहिणीच्या पतीसोबत विवाह करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. धमकी,मारहाण व दबावाखाली अल्पवयीन अवस्थेत विवाह लावून देण्यात आल्याचा तसेच त्यानंतर छळ झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान,आरोपी सविता चव्हाण यांच्या वतीने न्यायालयात मांडण्यात आले की, त्या फिर्यादीच्या सासू असून कथित घटनेत त्यांचा कोणताही थेट सहभाग नाही. सहआरोपी नितीन चव्हाण व किरण चव्हाण यांना यापूर्वीच नियमित जामीन मंजूर झाला असून सहआरोपी कविता चव्हाण यांनाही अंतरिम संरक्षण मिळाले आहे. तसेच अर्जदार वयोवृद्ध महिला असून त्यांच्याविरुद्ध कोणतेही ठोस आरोप नसल्याचा दावा बचाव पक्षाने केला.
बचाव पक्षाने फिर्याद कथित घटनेनंतर सुमारे नऊ महिन्यांनी दाखल करण्यात आल्याचा मुद्दाही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. अर्जदाराविरुद्ध कोणताही गुन्हेगारी पूर्वइतिहास नसून न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे पालन करण्याची तयारी असल्याने अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली.
सरकार पक्षाने अटकपूर्व जामिनास विरोध केला. मात्र दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मेहरोज के. पठाण यांनी १२ जून २०२६ रोजी जामीन अर्ज क्रमांक २३१०/२०२५ मध्ये आरोपी सविता सुरेश चव्हाण यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. कदीर औटी,ॲड. सौरभ तांदळे,ॲड. प्रतिक जाधव,ॲड.वैभव बोंगे,ॲड. ओंकार फडतरे,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड.मोहीम पठाण,ॲड. मनिष बाबरे,ॲड.रोहित थोरात,ॲड.संकेत पवार आणि ॲड. त्वरिता वाघ यांनी काम पाहिले. तर सरकार पक्षातर्फे ॲड. आनंद साळगावकर यांनी बाजू मांडली.
