जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘आईसाठी एक झाड’ अभियानाचा शुभारंभ
नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी पर्यावरण संरक्षणाला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याचे आवाहन केले. पर्यावरण संरक्षण ही आता केवळ निवड नसून मानवाच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक गरज बनली असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी उत्तर प्रदेशातील किचोचा शरीफ येथे वृक्षारोपण करून त्यांनी ‘आईसाठी एक झाड’ अभियानाचा शुभारंभ केला. मातृप्रेम आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड घालणाऱ्या या उपक्रमांतर्गत प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या नावाने किमान एक झाड लावावे, असे आवाहन त्यांनी केले.
देशभरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध वृक्षारोपण, जनजागृती आणि स्वच्छता अभियानांचे आयोजन करण्यात आले. मशिदी, मदरसे, शाळा, उद्याने, स्मशानभूमी, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेत भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी सिद्दीकी म्हणाले की, भारतीय संस्कृतीत निसर्गाला पूजनीय स्थान आहे. झाडे, जलस्रोत, जमीन आणि प्राणी यांचे संरक्षण केल्याशिवाय शाश्वत विकास शक्य नाही. अधिकाधिक वृक्षारोपण, जलसंधारण, प्लास्टिकमुक्त जीवनशैली आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण संरक्षण, स्वच्छ ऊर्जा, जलसंधारण आणि हरित विकासासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांना जनसहभागातून अधिक बळ मिळावे, असेही त्यांनी सांगितले.
जागतिक पर्यावरण दिन हा निसर्ग संवर्धनाची सामूहिक शपथ घेण्याचा दिवस असून स्वच्छ, हरित आणि निरोगी भारत घडविण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
