सोलापूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त १९ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या सांगता (विसर्जन) मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत.
सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ (१) (ब) अन्वये अधिसूचना जारी करत १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते २० एप्रिल पहाटे मिरवणूक संपेपर्यंत संबंधित मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांची ये-जा बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे.
बंद राहणारे प्रमुख मार्ग : डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते सम्राट चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुना पुणा नाका ते शिवाजी चौक, तसेच शिवाजी चौक, मेकॅनिक चौक, सरस्वती चौक, चार पुतळा, आंबेडकर चौक, डफरीन चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक, वाडिया हॉस्पिटल, चांदणी चौक, रेल्वे स्टेशन,गांधी पुतळा,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक आदी मार्गांवर वाहतूक पूर्णतः बंद राहील. तसेच संगमेश्वर कॉलेज ते जुना एम्प्लॉयमेंट चौक आणि डीएम आर ऑफिस परिसरातही निर्बंध असतील.
या मार्गांवर मिरवणुकीतील वाहने वगळता इतर सर्व वाहनांना प्रवेशबंदी तसेच पार्किंगलाही मनाई करण्यात आली आहे. मात्र पोलीस,रुग्णवाहिका,अग्निशमन दल व विशेष परवानगी असलेल्या वाहनांना सूट देण्यात आली आहे.
पर्यायी मार्गांची व्यवस्था : विजापूर रोड,हैदराबाद, तुळजापूर,पुणे मार्गावरील वाहतूक पत्रकार भवन चौक, महावीर चौक, गुरुनानक चौक,संत तुकाराम चौक,अशोक चौक,शांती चौक मार्गे वळविण्यात येईल. तसेच मंगळवेढा, अक्कलकोट व इतर भागांतून येणाऱ्या वाहनांसाठीही स्वतंत्र पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. जड वाहनांसाठी नवीन केगाव बायपास व अक्कलकोट नाका मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे,असे आवाहन केले असून आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
