सोलापूरच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात एक भक्कम आणि विश्वासार्ह नाव म्हणजे अविनाश कुलकर्णी. निर्भीड, प्रामाणिक आणि तत्त्वनिष्ठ पत्रकार म्हणून त्यांनी अनेक वर्षे आपल्या लेखणीच्या जोरावर समाजात जागरूकता निर्माण केली आहे.
‘दैनिक सांज’ चे संपादक म्हणून त्यांनी केवळ बातम्या दिल्या नाहीत, तर त्या मागील सत्य मांडण्याचे धाडसही दाखवले. त्यांच्या लेखणीतून नेहमीच सत्याचा आवाज उमटला आहे.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांनी अनेक नवोदित पत्रकारांना दिलेले मोलाचे मार्गदर्शन. त्यांच्या सहवासात घडलेले अनेक पत्रकार आज यशस्वीपणे आपली वाटचाल करत आहेत, ही त्यांच्या कार्याचीच खरी पावती आहे. पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून एक सामाजिक जबाबदारी आहे,ही जाणीव त्यांनी कायम जपली.
त्यांची लेखणी नेहमीच अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी, तर सामान्य माणसाच्या प्रश्नांना न्याय देणारी राहिली आहे. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि निर्भीड भूमिकेमुळे त्यांनी समाजात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य असूनही त्यांनी कधीही त्याचा गर्व बाळगला नाही. पद नसतानाही संस्थेप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि आपुलकी आजही सर्वांसाठी आदर्श आहे.
अशा या ज्येष्ठ,अनुभवी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि त्यांच्या लेखणीला अशीच ताकद लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
