सोलापूर : प्रभाग क्रमांक १८ व १९ मध्ये गेल्या एक महिन्यापासून पाण्याचा प्रेशर कमी येत असल्याने नागरिक त्रस्त होते. या समस्येचे मूळ कारण कल्याण नगर रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणात होत असलेली पाण्याची गळती असल्याचे समोर आले.
प्रभाग क्रमांक १९ चे जनसेवक नगरसेवक व्यंकटेश कोंडी यांनी ही बाब तात्काळ निदर्शनास आणून संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गळती दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
सदर दुरुस्तीचे काम ०८ एप्रिल २०२६ रोजी रात्री उशिरापर्यंत, पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होते तसेच दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतही काम सुरू ठेवण्यात आले.
०९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता नगरसेवक व्यंकटेश कोंडी यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित राहून कामाची पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,किस्तके व मुजावर हे उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जगन्नाथ दुद्याल व रमेश दिडी यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून कामाची माहिती घेतली.
या दुरुस्तीमुळे प्रभाग १८ व १९ मधील पाण्याचा प्रेशर लवकरच सुरळीत होईल,अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
