सोलापूर : अल्पवयीन मुलीवर विनयभंग,पॉक्सो व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या 20 दिवसांत जामीन मंजूर झाल्याची घटना बार्शीत घडली आहे.
दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्र. 248/2026 दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात भारतीय न्यायसंहिता कलम 74, पॉक्सो कायदा कलम 12 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(w)(i)(ii), 3(2)(va) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रारीनुसार, 4 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारास पीडितेची आई कपडे धुण्यासाठी तळ्यावर गेली असताना मुलगी घरी एकटी होती. काही वेळाने मुलगी घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर शोध घेत असताना ती शेख यांच्या वीटभट्टीवर आढळली. मुलीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तिला मोटारसायकलवर बसवून तेथे घेऊन गेला व तिच्याशी छेडछाड केली.
दरम्यान,आरोपीच्या वतीने ॲड.आयेशा इस्माईल शेख यांनी बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश वि.के.मांडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संबंधित आरोपीस गुन्हा नोंद झाल्यानंतर अवघ्या 20 दिवसांत जामीन मंजूर केला. या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. आयेशा इस्माईल शेख यांनी काम पाहिले.
