Ticker

6/recent/ticker-posts

खून प्रकरणात ३ सख्ख्या भावांची सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात निर्दोष मुक्तता.


नान्नज येथील खून प्रकरणात ३ सख्ख्या भावांची सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात निर्दोष मुक्तता.

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील गाजलेल्या खून प्रकरणात तीन सख्ख्या भावांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. सदर आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी दिला.





सदर प्रकरणात आरोपी क्र.१ पिंटू राजू पवार (वय २५ वर्षे), आरोपी क्र.२ कालिदास राजू पवार (वय २१ वर्षे) व आरोपी क्र.३ अनिल राजू पवार (वय १९ वर्षे), सर्व रा.नान्नज,ता.उत्तर सोलापूर,जि.सोलापूर यांच्याविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा र.क्र. ३८६/२०२३ दाखल करण्यात आला होता.





सदर गुन्हा दिनांक २३/०६/२०२३ रोजी घडल्याचे नमूद असून गुन्ह्याची नोंद २५/०६/२०२३ रोजी करण्यात आली. भारतीय दंड संहिता कलम ३०२, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन सत्र खटला क्रमांक ३३६/२०२३ चालविण्यात आला.

फिर्यादीच्या जबाबनुसार,मयत फुलचंद पवार यांना शिवीगाळ व वादातून मारहाण करण्यात आली होती. भांडणादरम्यान ते घरासमोरील चेंबरवर पडून गंभीर जखमी झाले व उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटल,सोलापूर येथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी वरील तिन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


सरकारतर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, आरोपीतर्फे वकिलांनी प्रभावी युक्तिवाद करताना फिर्याद नोंदविण्यास तब्बल दोन दिवसांचा विलंब झाल्याचे निदर्शनास आणले. तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षींमध्ये विसंगती असून त्यातून विश्वासार्हता निर्माण होत नसल्याचे मांडण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावेही संशयास्पद व अपुरे असल्याचे न्यायालयास पटवून देण्यात आले.


संबंधित प्रकरणातील सर्व बाबींचा सखोल विचार करून न्यायालयाने सबळ व ठोस पुराव्याअभावी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड.दत्तात्रेय कापुरे,ॲड.वैभव बोंगे,ॲड.ओंकार फडतरे,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड.मोहीम पठाण,ॲड.मनीष बाबरे,ॲड.रोहित थोरात, ॲड.त्वरिता वाघ व ॲड.अजय वाघमारे यांनी काम पाहिले. सरकारतर्फे ॲड.कुर्डूकर यांनी बाजू मांडली.