सोलापूर : सोलापूर येथील श्री समर्थ मराठी शाळेच्या विद्यार्थिनी फातिमा मोहसिन शेख व खतिजा मोहसिन शेख यांनी पवित्र रमजान महिन्याच्या पहिल्या रोज्याचे पालन करत समाजात शांतता आणि बंधुभावाचा संदेश दिला. दोन्ही विद्यार्थिनींनी पहाटे सहर करून दिवसभर उपवास ठेवत अल्लाहची इबादत केली.
रमजान महिना मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात रोजा ठेवून आत्मशुद्धी, संयम, त्याग आणि सहनशीलतेचे धडे घेतले जातात. फातिमा आणि खतिजा यांनीही लहान वयात श्रद्धा आणि निष्ठेने पहिला रोजा पूर्ण केला. दिवसभर उपवास केल्यानंतर सायंकाळी नमाज अदा करून त्यांनी देशात व जगात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात शांतता प्रस्थापित व्हावी, युद्ध थांबावे आणि सर्वत्र सौहार्द नांदावे यासाठी विशेष प्रार्थना केली.
या उपक्रमामुळे शाळेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थिनींचे कौतुक करत त्यांच्या या कृतीतून समाजात बंधुभाव आणि मानवतेचा संदेश जात असल्याचे सांगितले. लहान वयातच धार्मिक कर्तव्याबरोबरच सामाजिक जाणीव जपल्याबद्दल दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात आले.
रमजानच्या निमित्ताने दिलेला शांततेचा हा संदेश समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
