Ticker

6/recent/ticker-posts

रमजानुल मुबारक -१०. इन्सानियत (मानवता) हाच मोठा धर्म



इन्सानियत (मानवता) हाच मोठा धर्म                  
रमजान महिन्याचा पहिल्या दहा दिवसांचा भाग (अशरा ) आज पूर्ण होत आहे. रहेमत (कृपादृष्टी) चा हा काळ पूर्ण होऊन मगफिरत (माफी) चा दुसरा भाग आज सुरु होईल. कुरआन आणि त्याची शिकवण यावर जे संशोधन, विचारमंथन आजपर्यंत झालेले आहे. त्यानुसार एक गोष्ट स्पष्ट झाली आहे कि कुरआन हा मानवनिर्मित ग्रंथ नाही. कुणा विद्वानाने तो लिहीलेला नाही तर त्यातील शब्द,आयती,सुरए हे साक्षात परमेश्वर अर्थात अल्लाहने निर्माण केले आहे. अरब जगतासह अनेक ठिकाणी कुरआन मधील आयता सारखी वाक्ये तयार करण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला. पण त्यात कुणी यशस्वी होऊ शकला नाही. त्यातील एक एक शब्द हा मोठा अर्थपूर्ण असून कुरआन हा दैवी ग्रंथ आहे यावर शिक्कामोर्तब करणारा आहे. 




प्रेषित हजरत पैगंबरांनी अल्लाहच्या आदेशाने ज्यावेळी इस्लाम धर्माचा प्रसार सुरु केला. त्यावेळी सामाजिक परिस्थिती खूप बिघडलेली होती. सामाजिक अध:पतनाच्या सर्व सीमा ओलांडल्या गेल्या होत्या. रानटी प्रवृत्तीनी थैमान घातले होते. गडद अंधारात एक काजवा चमकावा व त्यामुळे क्षणभर तरी तो अंधार दूर व्हावा त्याप्रमाणे हजरत पैगंबरांच्या रुपाने समाजाला दिशा देणारा मार्गदर्शक अल्लाहने निर्माण केला. त्यांनी अल्लाहकडून प्राप्त होणारे आदेश लोकांपर्यंत पोहोचविले व नविन समाज निर्मितीचा प्रारंभ झाला. सुरुवातीला हा आरंभ करतांना हजरत पैगंबरांना मोठा त्रास सहन करावा लागला. परंतु जसजसे सत्य समोर येत गेले तसे त्यांचे विरोधकही समर्थक बनले. समाजातील अनेक अनिष्ट प्रथा हजरत पैगंबरांनी झुगारुन दिल्या. मानवता,समता व समरसतेचा संदेश समाजाला दिला. आपण सर्वसमान आहोत. कुणीही ज्येष्ठ अथवा कनिष्ठ नाही. सर्वजण आपसात भाऊ भाऊ आहोत ही नवी संकल्पना त्यiनी समाजाला दिली. सामाजिक न्यायाच्या अनेक गोष्टी त्यांनी विशद केल्या. मुलींच्या जन्माचा तिटकारा करणारांना समज दिली. अल्लाहची उपासना हीच एकमेव भक्ती असून तोच एकमेव उपास्य आहे. इतर कुणीही पूजनीय नाही असे सांगून एकेश्वर वादाचा पाया घातला. आपसातील भांडण,तंटे,वाद हे निरर्थक असल्याचे सांगून क्षुल्लक गोष्टींवरून रक्तपात करणारांना माणुसकीची शिकवण दिली. सुख,दुःख,हमदर्दी यांची नवी संकल्पना त्यांनी मांडली. ईश्वरभक्ति केल्याने मनाला प्राप्त होणारी शांती हेच जीवनाचे सार आहे हे स्पष्ट केले. स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगा. समाजाच्या प्रति ही तुमची काही कर्तव्ये आहेत हे त्यांनी स्पष्टपणे मांडले.




 
स्वार्थ आणि परमार्थ यातील फरक स्पष्ट केला व जो ईतरांच्या भल्यासाठी जगला तोच इन्सान होय ही नवी संकल्पना त्यांनी निर्माण केली. ( क्रमशः)
सलीमखान पठाण