घरगुती कारणावरून सासऱ्याचा गळा चिरला
दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावात घडलं भयंकर रक्तरंजित थरार
पत्नी मुंबई पोलीस दलात,म्हेवणा एसआरपीएफ दलात सादिकने उचलले टोकाचे पाऊल
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावात जावयाने सासऱ्याचा गळा चिरून ठार केले आहे. आणि स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सादिक दफेदार(वय ३५ रा,पान मंगरूळ,ता.दक्षिण सोलापूर) असे जावयाचे नाव आहे.सिकंदर मूलका शेख(वय ५५ रा इंगळगी,ता दक्षिण सोलापूर) असे मृत सासऱ्याचे नाव आहे. २४ फेब्रुवारी रोजी मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सिकंदर शेख हे शेतात होते,त्यावेळी शेतात कोण नसल्याचा फायदा जावई सादिक दफेदारने उचलला. घरगुती कारणावरून जावई अनेक महिन्यापासून सासऱ्यावर चिडून होता,मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास जावयाने सासरा सिकंदरला शेतात गाठले आणि गळा चिरला. सासऱ्याचा गळा चिरून तो घरी निघाला होता,मात्र ग्रामस्थांना माहिती होताच,भेदरलेल्या जावयाने चाकूने स्वतःच्या छातीत मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या सर्व घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात दाखल होत आहे.
घरगुती कारणावरून अनेक वर्षांपासून जावयाला लांब केलं होतं - सिकंदर शेख यांना चार मुली दोन मुलं आहेत. यामधील दुसऱ्या क्रमांकाची आणि तिसऱ्या क्रमांकची मुलगी एकाच घरात म्हणजेच पानमंगरुळ (दक्षिण सोलापूर) गावात दिली आहे. संशयीत आरोपी सादिक दफेदार हा तिसऱ्या क्रमांकचा जावई होता. सादिकची पत्नी मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. लग्नानंतर सादिक हा पोलीस पत्नीवर संशय करत होता. काही महिने सादिक दफेदार हा पत्नीसोबत मुंबईत राहत होता. मुंबईत देखील सादिक हा पोलीस पत्नीवर संशय घेत मारहाण करत होता. सादिकचे सासरे सिकंदर शेख यांनी अनेकदा बैठका घेऊन जावई सादिक दफेदारची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. मागील वर्ष दीड वर्षांपासून संशयीत आरोपी जावई सादिक दफेदार याने डाव धरला होता. पोलीस पत्नीलाच खलास करतो असे अनेकदा त्याने धमकीही दिली होती. सिकंदर शेख यांनी जावयास मुलीपासून लांब केलं होतं,आणि घटस्फोट साठी मुली मार्फत खटला दाखल केला होता. याचाच राग मनात धरून २४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास आरोपी जावई सादिक दफेदार याने सासऱ्याचा गळा चिरून हत्या केली. सिकंदर शेख यांचा जागीच मृत्यू झाला.
जवयाने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला -
इंगळगी गावातील शेतातच जावई सादिक याने सासरा सिकंदर शेख याची गळा चिरून हत्या केली. आजूबाजूच्या शेतातील शेतकऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तडफडत असलेल्या सिकंदरकडे धाव घेतली. त्यावेळी सादिक दफेदार याने स्वतःवर चाकूने वार करत आत्महत्या करण्याचं प्रयत्न केला. इंगळगी गावातील ग्रामस्थांनी ताबडतोब वळसंग पोलीस स्टेशनला कळविले. पोलिसांनी सादिक व सिकंदर या दोघांना बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले,असता,सिकंदर(सासरा) याचा जाग्यावरच मृत्यू झाला होता. सादिक(जावई )यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
