उपमुख्यमंत्री व ज्येष्ठ पत्रकारा रांना श्रद्धांजली देणे महापालिकेला विसर
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दि. ४ फेब्रुवारी २०२६ बुधवार रोजी सोलापूर शहरातील पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. पत्रकारांच्या कार्याचा गौरव करणारा हा उपक्रम निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र या कार्यक्रमात प्रशासनाची असंवेदनशीलता आणि विसरभोळेपणा प्रकर्षाने समोर आला.
कार्यक्रमात,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे अपघाती निधन झाले होते. अशा परिस्थितीत किमान दोन मिनिटांची श्रद्धांजली देणे हे प्रशासनाचे नैतिक कर्तव्य होते. मात्र या गंभीर घटनेचा कार्यक्रमात साधा उल्लेखही करण्यात आला नाही, हे अत्यंत खेदजनक आहे.
याचप्रमाणे दैनिक लोकसत्ता सोलापूर प्रतिनिधी,ज्येष्ठ पत्रकार एजाज हुसेन मुजावर व पूर्वपार दैनिक केसरी,नंतर दैनिक सुराज्यचे पत्रकार बळीराम सर्वगोड यांचे सुमारे एक महिन्यापूर्वी निधन झाले होते. पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात आपल्या ज्येष्ठ पत्रकाराच्या स्मृतींना अभिवादन करणे अपेक्षित असताना त्यांचे नावसुद्धा कुणी उच्चारले नाही,ही बाब पत्रकार बांधवांसाठी वेदनादायी ठरली आहे.
महानगरपालिकेला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना विसरणे शोभणारे नाही,आणि त्याच वेळी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित पत्रकार बांधवांनीही आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्याला विसरणे हे आत्मपरीक्षण करण्यासारखे आहे.
पत्रकार दिन म्हणजे केवळ सत्कार आणि फोटोसेशन नव्हे, तर पत्रकारितेच्या मूल्यांची,संवेदनशीलतेची आणि स्मृतींची जपणूक करण्याचा दिवस आहे. भविष्यात असे कार्यक्रम घेताना प्रशासनाने व आयोजकांनी जबाबदारी,भान आणि संवेदना दाखवाव्यात,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
