सोलापूर : प्रजासत्ताक दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधान पुस्तकाचे पूजन न केल्याबाबत. २६ जानेवारी रोजी संपूर्ण भारत देश मोठ्या उत्साहात 'प्रजासत्ताक दिन' साजरा करतो. याच दिवशी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले,ज्याचे मुख्य शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत.
परंतु,अत्यंत खेदाने नमूद करावे लागते की,सोलापूर महानगरपालिका व सोलापूर जिल्हा परिषद येथील मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नाही. ही कृती संविधानाचा आणि लोकशाही मूल्यांचा अपमान करणारी आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संविधानाच्या निर्मात्याला विसरणे हे केवळ दुर्लक्ष नसून ती एक गंभीर चूक आहे.
मुख्यालयातील अप्पासाहेब वारद यांच्या पुतळ्याचे आपण पूजन केले मात्र संविधानकर्त्याला टाळले,हे कोणत्याही शासन निर्देशांनुसार नक्कीच नसेल. तरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व पालिका आयुक्त या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन पुढील संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कास्ट्राईब प्राथमिक शिक्षण संघटनेच्या वतीने निवेदन द्वारे करण्यात आले.
याप्रसंगी कास्ट्राईब संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष,श्रीशैल कोरे,जिल्हा सचिव सोमलिंग कोळी,जेष्ठ मार्गदर्शक संग्राम सोनकांबळे,दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष श्रीरंग बनसोडे,सचिव बाबुराव गायकवाड,उत्तर सोलापूरचे अध्यक्ष अमरीश गोसावी,लालनाथ चव्हाण यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
