सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूका १५ जानेवारी रोजी संपन्न होणार आहेत. सोलापुरात इच्छुक नगरसेवकांची लगबग सुरू झाली आहे. महायुतीमधील भाजप,शिवसेना,आणि राष्ट्रवादी या पक्षात इनकमिंग मोठ्या प्रमाणांत वाढले आहे. दोनच दिवसांपूर्वी प्रणिती शिंदें यांचे खंदे समर्थक कट्टर कार्यकर्ते विनोद भोसले यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला आहे. काँग्रेसमधून गळती लागल्याच कळताच काँग्रेसच्या खा प्रणिती शिंदें सोलापूर शहरात दाखल झाल्या आहेत. सोमवारी दुपारी काँग्रेस भवन येथे पदाधिकाऱ्याची बैठक घेत मार्गदर्शन केले. माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना खा प्रणिती शिंदें यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला उमेदवार मिळत नाहीय म्हणून ते आमचे लोक चोरी करत आहेत. वोट चोरी नंतर भाजप आता लोकचोरीकडे अधिक लक्ष देत आहे असं टोला खा.प्रणिती शिंदें यांनी विरोधकांना लगावला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मधील जुन्या लोकांना संधी देऊ - भारतीय जनता पार्टी पक्षात दुसऱ्या पक्षातुन जाणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.भाजपामध्ये जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर त्यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडे आहेत. त्या जुन्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना,काँग्रेस मनापासून स्वीकारावी. भाजप सोडून मनापासून काँग्रेसमध्ये आल्यास निश्चितच आम्ही त्यांना न्याय देऊ असे आवाहन खा. प्रणिती शिंदें यांनी केले आहे.
नगरपरिषदांच्या निवडणुकीत भाजपचा अहंकार तुटला - भाजप पक्ष सत्तेत आल्यापासून वोट चोरी करत आहे. वोट चोरी नंतर लोक चोरी सुरू आहे. अशी टीका खा प्रणिती शिंदेंनी केली आहे. नगरपरिषद/नगरपालिका निवडणुकी अगोदर भाजपला अहंकार होता,सोलापूर जिल्ह्यातील ११ पैकी ११ नगरपरिषदेत भाजपची सत्ता येईल असे सांगत होते. जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवून दिली आहे. अशी टीका खा. प्रणिती शिंदें यांनी केली आहे.
