जिल्हा प्रशासनाच्या वतीने अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा
सोलापूर : सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा नियोजन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पसंख्यांक हक्क दिन नियोजन भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. शासनाच्या वतीने अल्पसंख्याकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देऊन प्रशासन त्या योजनाची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. तसेच अल्पसंख्याकांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याची माहिती कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांनी दिली.
या कार्यक्रमास अल्पसंख्यांक हक्क आयोगाचे राज्य सदस्य वसीम बुरान,उपजिल्हाधिकारी सीमा होळकर अध्यक्षस्थानी होते. जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार,उप मुख्यनियोजनकारी अधिकारी स्मिता पाटील, शिक्षणाधिकारी कादर शेख, अल्पसंख्यांक समिती सदस्य अनिल विपत, कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे,सहाय्यक नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व अल्पसंख्यांक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमात शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी अल्पसंख्यांकांच्या शिक्षण,रोजगार उन्नती तसेच शासनाने दिलेल्या हक्कांची माहिती दिली. जिल्हा नियोजन अधिकारी यांनी शिक्षण व रोजगारासंबंधी प्रशासनाच्या योजनांचा आढावा सादर केला.
महिला व बालविकास विभागांतर्गत पोषण आहार, लसीकरण, पूर्व प्राथमिक शिक्षण,आरोग्य तपासणी,मदरसा आधुनिकीकरण योजना, शिष्यवृत्ती योजना,मुलींसाठी वस्तीगृह सुधारणा, समुपदेशन कार्यक्रम याबाबत माहिती देण्यात आली. तसेच जिल्हा नियोजन कार्यालयामार्फत पायाभूत सुविधा,नागरी उपजीविका अभियानांतर्गत महिला बचत गट स्थापन,फिरते निधी वाटप,मुख्यमंत्री व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम,औद्योगिक प्रशिक्षण संस्था,ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत घरकुल योजना यांचा आढावा घेण्यात आला.
पोलीस अधीक्षक ग्रामीण मार्फत शांतता समितीच्या बैठका, हिंदू-मुस्लिम समाजातील दखलपात्र गुन्ह्यांवर नियंत्रण याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाद्वारे अल्पसंख्यांक समाजासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या कार्यक्रमास अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
