पॉक्सो कायद्या-अंतर्गत मुंबई उच्च-न्यायालय,कोल्हापूर खंडपीठाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटकेतील आरोपीस सशर्त जामीन मंजूर...
सोलापूर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात दिनांक ०४ मार्च २०२५ रोजी गु.र.क्र. ०१३६/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(२)(आय), १३७(२) आणि ३५१(२) तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा,२०१२ चे कलम ४,८ आणि १२ प्रमाणे आरोपी सिद्धलिंगप्पा शिवलिंगप्पा कलदे (वय २८, रा.मदन हिप्परगा,ता.आळंद,जि.कलबुर्गी (गुलबर्गा), राज्य:कर्नाटक) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.
फिर्यादी यांनी दिनांक ०४/०३/२०२५ रोजी दिलेल्या जबाबात नमूद केले की,आरोपी सिद्धलिंगप्पा कलदे हा मैंदर्गी,ता.अक्कलकोट येथील बोरी नावाच्या शेताला लागून असलेल्या शेतात ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत असे आणि त्यांची व त्यांच्या अल्पवयीन मुलीची आरोपीसोबत गेल्या १५ दिवसांपासून ओळख झाली होती.
दिनांक ०३ मार्च २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता फिर्यादीची मुलगी घरातून बोरी शेताकडे जात असल्याचे सांगून निघाली. दुपारी १२:०० वाजताच्या सुमारास आरोपी सिद्धलिंगप्पा कलदे याने मुलीला भेटून 'तुला घरी सोडतो' असे सांगून आपल्या मोटारसायकलवर बसवले,परंतु तिला मैंदर्गी येथे न सोडता तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिला जबरदस्तीने मादनहिप्परगा,जि.गुलबर्गा,कर्नाटक येथे पळवून नेले. तेथील मंदिरात फिरवून परत आणले आणि मैंदर्गी येथील बोरी नावाच्या शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये रात्री ०९:०० वाजताच्या सुमारास तिच्या इच्छेविरुद्ध,अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच, याबद्दल आई-वडिलांना सांगितल्यास त्यांना संपवून टाकेन अशी धमकी देऊन तिला मैंदर्गी नाक्यावर सोडून निघून गेला. त्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात येऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.
आरोपी सिद्धलिंगप्पा शिवलिंगप्पा कलदे यास दिनांक १०/०३/२०२५ रोजी अटक करण्यात आली होती.
तद्नंतर आरोपी सिद्धलिंगप्पा कलदे याने जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे आपला जामीन अर्ज दाखल केला होता तो अर्ज नामंजूर झाल्यानंतर आरोपी तर्फे मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ येथे जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणी आरोपीतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की,घटना घडली त्या वेळी पिडित मुलगी अंदाजे १५ वर्षांची होती. घटनेनंतरचा कालावधी पाहता,पीडिता सुमारे २४ तास आरोपीसोबत होती,परंतु त्या कालावधीत तिने कोणताही आरडाओरडा केला नाही,मदतीसाठी बाहेरील व्यक्तींशी संपर्क केला नाही किंवा तिला बळजबरी करण्यात आल्याचे तत्काळ संकेत दिले नाहीत. आरोपीस अटक होऊन आजतागायत ८ महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असून तो संपूर्ण कालावधी न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपीचे कोणतेही गुन्हेगारी पूर्वइतिहास नसून त्याच्यावर यापूर्वी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. तसेच सर्व परिस्थितींचा एकत्रितपणे विचार केल्यास,आरोपीस जामीन मंजूर करण्यात यावा.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती शिवकुमार दिघे,मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ यांनी दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपी सिद्धलिंगप्पा शिवलिंगप्पा कलदे यास सशर्त जामीन मंजूर केला आहे.
सदर प्रकरणी आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड.सौरभ तांदळे,ॲड.दत्तात्रेय कापुरे, ॲड.वैभव बोंगे,ॲड.ओंकार फडतरे,ॲड.रोहित थोरात,ॲड.मोहीम पठाण,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड.मनिष बाबरे,ॲड.अभिषेक नागटिळक,ॲड.अजय वाघमारे आणि ॲड.त्वरिता वाघ यांनी काम पाहिले.
