महाविकास आघाडीत बिघाडी होतेय का?
राज्यात कुठेही काँग्रेस सोबत लढू मात्र सोलापुरात खा. प्रणिती शिंदें असतील तर आम्ही स्थानिक निवडणूका स्वतंत्र लढणार
सोलापूर : सोलापुरात काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद चाहवाट्यावर आला आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा पक्ष आणि काँग्रेस आमनेसामने आले होते. शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या घटनेची आठवण करून देत खा प्रणिती शिंदेंवर सडकून टीका केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खा प्रणिती शिंदें सोबत आम्ही शिवसेना ठाकरे पक्ष युती करणार नाही अशी माहिती शरद कोळी यांनी दिली आहे. शरद कोळी यांच्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी येतेय की काय असे चित्र निर्माण झाले आहे.
शरद कोळी यांनी माध्यमां समोर बोलताना विधानसभा निवडणुकीत काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खा. प्रणिती शिंदेंच्या सुचनेनुसार काम केले होते,त्यांची नावे मी आत्ता उघडकीस आणणार नाही. परंतु ज्यांनी शिवसेने सोबत गद्दारी केली त्यांची स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत हयगय केली जाणार नाही. प्रणिती शिंदें या लोकसभा निवडणुकीत खासदार होण्यासाठी मातोश्री वर येऊन उद्धव ठाकरेंच्या पाया पडल्या होत्या,विधानसभेत मात्र त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारासोबत गद्दारी करत,भाजप उमेदवाराला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला होता अशी जहरी टीका शरद कोळी यांनी केली आहे.
