Ticker

6/recent/ticker-posts

जैन संस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन


जैन समाजाने मंदिर ट्रस्ट प्रॉपर्टीचे लॅन्डमार्क करून घ्यावेत - उपजिल्हाधिकारी

HND बचाव साठी सोलापूरातील विविध जैन संस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

सोलापूर : पुणे येथील सुप्रसिद्ध  हिराचंद नेमचंद जैन बोर्डिंग (HND) ही संस्था सार्वजनिक ट्रस्टची असताना देखील समाजाला विश्वासात न घेता संस्थेची गैरमार्गाने कवडी मोल भावात विक्री करण्यात आली आहे. सदर संस्थेच्या गैर विक्री प्रकरणामुळे HND बचाव मोहीमेच्या अंतर्गत मूक मोर्चा तसेच विविध मार्गातून उपक्रम सुरू आहेत आणि ट्रस्ट व बिल्डर या दोघांनाही समाजाच्या वतीने खरेदीखत रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात आले आणि त्या अनुषंगाने आज २७ ऑक्टोबर रोजी दुपारी ०४ वाजता सदर खरेदीखत रद्द व्हावे यासाठी सोलापूर शहर मधील सकल जैन समाज,सर्व जैन मंदिर ट्रस्ट, शैक्षणिक व सामाजिक संस्था तसेच विविध जैन महिला व युवक मंडळाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन देण्यात आले.
    

जैन बोर्डिंगची जागा खरेदी करणाऱ्या विकासक कंपनीने समाजाच्या विनंतीला मान देऊन व्यवहार रद्द करण्याची विनंती करणारा ई-मेल पाठविला आहे. मात्र, जोपर्यंत सरकार हा विक्री व्यवहार पूर्णपणे रद्द करीत नाही, बोर्डिंगच्या जागेवर ट्रस्टचे नाव पुन्हा लावत नाही, तोपर्यंत समाजाचा लढा संपणार नाही आणि १ नोव्हेंबर पर्यंत हा प्रश्न मार्गी नाही लागला तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सकल जैन समाजाने व्यक्त  केले.


  
समाजाच्या वतीने धीरज बलदोटा यांनी या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती उपजिल्हाधिकारी यांना दिली. निवेदन दिल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी  "महाराष्ट्र मधील सर्व जैन समाजाने मंदिर ट्रस्ट प्रॉपर्टीचे लॅन्डमार्क करून घ्यावेत म्हणजे असे गैरव्यवहार भविष्यात होणार नाही" असे मत व्यक्त केले. याप्रसंगी सोलापूर सकल जैन समाज,सर्व मंदिर ट्रस्टी,शैक्षणिक व सामाजिक संस्था तसेच विविध महिला व युवक मंडळाचे पदाधिकारी व श्रावक-श्राविका बहुसंख्येने उपस्थित होते.