सोलापूर : गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेता भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण व नगरपालिका हद्दीत लागू करण्यात आले आहे.
या आदेशानुसार, दि. २५ ऑगस्ट २०२५ पासून पुढील ६० दिवसांपर्यंत जिल्ह्यातील सर्व मर्मस्थळे व धार्मिक स्थळांवर ड्रोन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर,पंढरपूर व श्री स्वामी समर्थ मंदिर,अक्कलकोट यांचा समावेश आहे.
दहशतवादी संघटनांकडून ड्रोनचा वापर करून संभाव्य घातपाती कृत्यांची शक्यता नाकारता येत नसल्याने सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. सदर आदेशाचे काटेकोर पालन करावे,असे अपर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.