आणीबाणीधारकांसाठी मानधन योजनेत सुधारणा, अर्जासाठी अंतिम मुदत २४ नोव्हेंबर पर्यंत
सोलापूर : सन १९७५ ते १९७७ दरम्यानच्या आणीबाणी कालावधीत मिसा व डी.आर.आय. अंतर्गत सामाजिक व राजकीय कारणांसाठी बंदिवास / कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या मानधन योजनेत सुधारणा करण्यात आली असून,अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील संबंधित नागरिकांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करावेत,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
दि. २८ जुलै २०२२ रोजी सुरु झालेल्या योजनेत पूर्वी निश्चित केलेली अंतिम मुदत (३१ ऑक्टोबर २०२२) शिथिल करण्यात आली आहे. यामुळे योजनेचा लाभ न घेऊ शकलेल्या पात्र आणीबाणीधारकांना नव्याने अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अर्जासोबत शासन पुरक पत्र दिनांक १५ सप्टेंबर २०१८ मधील परिशिष्ट "ब" मधील शपथपत्र जोडणे आवश्यक आहे.
ज्या आणीबाणीधारकांचा दि. ०२ जानेवारी २०१८ पूर्वी मृत्यू झाला आहे,अशा व्यक्तींच्या हयात असलेल्या पती/पत्नींनाही अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. अर्जाच्या दिनांकापासून मानधन अनुज्ञेय राहील. जिल्हाधिकारी यांना मंजूरीचे अधिकार देण्यात आले असून,अर्जाच्या अनुषंगाने आवश्यक निधीची माहिती शासनास दि. ०५ डिसेंबर २०२५ पर्यंत सादर करणे बंधनकारक राहील.
सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व पात्र आणीबाणीधारक व त्यांच्या पती/पत्नी यांना आवाहन करण्यात येते की,त्यांनी विहित मुदतीत म्हणजेच दि. २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय,सोलापूर येथे सादर करावा.
ही योजना लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.