Ticker

6/recent/ticker-posts

ऑटो रिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सभासद नोंदणीसाठी आवाहन


धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो/रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या दिनांक २४ जुलै २०२४ च्या निर्णयानुसार धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो/रिक्षा मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ, मुंबई स्थापन करण्यात आले असून,सोलापूर शहर व जिल्ह्यातील ऑटो रिक्षा चालकांसाठी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येत आहे.


या योजनांमध्ये वय ६५ वर्षावरील चालकांसाठी सन्मान निधी योजना, कर्तव्यावर असताना जीवन विमा व अपंगत्व विमा, आरोग्य लाभ योजना, कामगार कौशल्य वृद्धी योजना, दुखापतीसाठी अर्थसाहाय्य, तसेच पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना यांचा समावेश आहे.
 
सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी चालकांनी मंडळाचे सभासद होणे आवश्यक असून, http://ananddighekalayankarimandal.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. अर्जासाठी नोंदणी व ओळखपत्र शुल्क ₹५००/- आणि सभासद शुल्क ₹३००/- शासनाकडून निश्चित करण्यात आले आहे.




 
सभासदत्वासाठी अर्जदाराकडे राज्य शासनाकडून नोंदणीकृत ऑटो रिक्षा किंवा मिटर्ड टॅक्सी अनुज्ञप्ती व वैध बॅच असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय,सोलापूर येथे संपर्क साधावा,असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.